उपवासाची भगर खाल्ली, 20 जणांना झाली विषबाधा

उपवासाची भगर खाल्ली, 20 जणांना झाली विषबाधा
चिखली  : (एशिया मंच वृत्त)
       एकादशीच्या उपवासाला भगर खाल्याने चिखली तालुक्यातील सहा तर शेजारील जाफ्राबाद तालुक्यातील दोन गावातील तब्बल २० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार २२ सप्टेंबरच्या सकाळी समोर आला. विविध गावातील या रूग्णांवर येथील चार खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, ऐन नवरोत्रोत्सवाच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे. 
       अधिक वृत्त असे की, २१ सप्टेंबर 2022 रोजी एकादशी होती. अनेक भाविक नित्यनेमाने हा उपवास धरतात. यातील पेठ, आमखेड, गोद्री, साकेगाव, भालगाव, सिंदी हराळी या सहा गावांसह जाफ्राबाद तालुक्यातील वरूड व कोळगाव येथील भाविकांनी फराळासाठी आपल्या गावातील विविध किराणा दुकानांतून भगर व भगरीच्या पीठाची खरेदी केली होती. दरम्यान या भगरीचा फराळ खाल्ल्यानंतर अनेकांना मळमळ, उलटी, जुलाब, डोकेदुखी व घबराट आदी त्रास जाणवू लागला. काहींनी अ‍ॅसीडीटी असेल म्हणून सुरूवातील दूर्लक्ष केले. मात्र, त्रास वाढल्याने नातेवाईकांची चांगलीच धांधल उडाली. नातेवाईक व ग्रामस्थांनी तातडीने त्रास होणाऱ्याना चिखलीतील विविध खासगी रूग्णालयात दाखल केले आहे.         शहरातील विविध रूग्णालयात उपचारार्थ दाखल रूग्णांची एकूण संख्या २० आहे. यामध्ये तायडे हॉस्पिटलमध्ये आमखेड येथील वंदना प्रदीप वाघ (वय ४०), कमलबाई गजानन वाघ (वय ५५), अंबादास भिमराव वाघ (वय ४५), गोद्री येथील पांडूरंग विठ्ठल भवर (वय ७०), सुमनबाई भवर (वय ६५), पद्माबाई भवर (वय ४०) व कु.गायत्री भवर (वय २१) असे एकूण ७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. डॉ.मिसाळ यांच्या दवाखान्यात साकेगाव येथील एकाच कुटूंबातील प्रदुम्न जगताप, नारायण जगताप व गीता जगताप या ३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर चिंचोले हॉस्पीटलमध्ये शेषराव शेळके व कुशिवर्ता शेळके रा.कोळगाव, विजय सुरडकर, अनिता सुरडकर, ओम सुरडकर रा.शिंदी हराळी, व शीतल सोळंकी रा.भालगाव या सहा रूग्णांचा समावेश आहे. तर जयस्वाल हॉस्पिटलमध्ये भागूबाई जनार्दन सावळे रा.वरुड व उमाबाई वसंतराव ढोणे आणि वसंतराव संपतराव ढोणे रा.पेठ हे याप्रमाणे रूग्ण दाखल झाले आहेत. 
      विषबाधा झाल्यानंतर उपचारार्थ दाखल रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ.सुहास तायडे यांनी दिली असून संबधीत डॉक्टरांनी याबाबत प्रशासनालाही अवगत केले आहे. दरम्यान नवरात्रोत्सवात मोठ्याप्रमाणावर उपवास केले जातात व त्यासाठी भगरीचा वापरही मोठ्या प्रमाणावर केला जातो. अशास्थितीत भगरीमुळे विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आल्याने अनेकांनी भगरीची धास्ती घेतली आहे. 

 एकाच दुकानातून झाला होता पुरवठा
       विषबाधा झालेले रूग्ण वेगवेगळ्या गावातील असले तरी त्यांनी गावातून ज्या दुकानदारांकडून भगर व त्याच्या पिठाची खरेदी केली होती. त्या दुकानदारांनी भगर व भगरीचे पीठ शहरातील व्यापारी विक्रम वाधवाणी यांच्याकडून ठोक स्वरूपात नेला होता, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान भगरीमुळे विषबाधा झाल्याची माहिती मिळाताच व्यापारी वाधवाणी यांनी तातडीने एकलारा, पेठ, गोद्री, केसापूर तसेच इतर दुकानदारांशी संपर्क साधून त्यांच्याकडील भगर न विकण्याचे सांगितले आहे. सोबतच त्यांच्याकडे असलेला उर्वरित माल देखील फेकून दिला असल्याचे स्पष्ट केले आहे. वाधवाणी यांनी या मालाचा पुरवठा नाशिक येथील एजंटमार्फत झाला होता. त्यातून त्यांनी भगरिचे पीठ तयार करून सुमारे १२ ते १३ कट्टे विकले होते. 
        याप्रकरणात चिखली येथील डॉ. सुहास तायडे, डॉ. प्रियेश जैस्वाल व डॉ. संतोष चिंचोले यांनी सांगितले की, आमच्या रुग्णालयात दाखल झालेल्या या सर्व रुग्णाणी भगर खाल्याने उलटी, डोकेदुखी, चक्कर येणे व घबराट सारखी बाधा झाली आहे. या सर्वांवर काल पासून उपचार सुरू असून सध्या सर्वांची तब्येत स्थिर आहे व प्राथमिक चाचणी नुसार या भगर मधून विषबाधा झालेली असल्याचे आढळते.