हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान* दुबार पेरणीसाठी बियाणे व तातडीने भरपाई देण्यात यावी : जयश्रीताई शेळके

हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
* दुबार पेरणीसाठी बियाणे व तातडीने भरपाई देण्यात यावी :  जयश्रीताई शेळके
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         जिल्ह्यात बुलडाणा, मोताळा आणि चिखली तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीन या पिकावर हुमणी अळी (White grub) या किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना गंभीर आर्थिक फटका बसत असून, काही ठिकाणी ८०% पर्यंत नुकसान झाल्याचे आढळले आहे.

           हुमणी अळी ही जमिनीच्या आत राहणारी कीड असून, ती पिकांच्या मुळांवर उपजीविका करते. त्यामुळे पिकांची मुळे सडू लागतात, पाने पिवळी पडतात, वाढ खुंटते आणि उत्पादनात लक्षणीय घट होते. ऊस, सोयाबीन, कापूस, हळद यांसारख्या पिकांमध्ये या अळीचा प्रादुर्भाव विशेष करून दिसून येतो.

           बुलडाणा जिल्ह्यातील कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजित अहवालानुसार सध्या ३१४.७४ हेक्टर क्षेत्र हुमणी अळीमुळे बाधित झाल्याचे नोंदवले गेले आहे. मात्र, प्रत्यक्षात बाधित क्षेत्र यापेक्षाही जास्त असल्याचा अंदाज स्थानिक शेतकरी व तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली होती. आज त्यांनी मोताळा तालुक्यातील मोहेगाव शिवारात पीक पाहणी केली. त्यांच्या मते फक्त पंचनामे करून भागणार नाही. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मोफत किंवा सवलतीत बियाणे उपलब्ध करून द्यावेत. तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर वितरित करावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. 

         पावसाचे अनिश्चित स्वरूप, हुमणी अळीचा प्रकोप आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने पंचनाम्यांनंतर केवळ अहवाल नोंदवून थांबू नये, तर बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिली जावी. शासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ॲड.जयश्रीताई शेळके यांनी केली आहे. पिक पाहणी करतेवेळी मोताळा कृषि सहायक माधुरी बुंदे, राजूरचे तलाठी अजित पालवे, गोपीचंद राठोड, भास्कर पवार, लीलाबाई राठोड, धुपेशवर राठोड, प्रमिला बाई राठोड, उखा राठोड, गजानन जाधव, भारत राठोड, सागर चव्हाण, गजानन चव्हाण, आकाश राठोड. सचिन राठोड यांच्यासह मोहेगाव येथील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.