सत्ताधाऱ्यांनो, शो बाजी करण्याऐवजी शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या * सिंदखेडराजा येथील जनआंदोलनात संदीपदादा शेळके गरजले

 सत्ताधाऱ्यांनो, शो बाजी करण्याऐवजी शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या 
* सिंदखेडराजा येथील जनआंदोलनात  संदीपदादा शेळके गरजले 
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
      वन बुलढाणा मिशनचे संकल्पक  संदीपदादा शेळके यांच्या नेतृत्वात आज 30 नोव्हेंबर 2023 सिंदखेडराजा तहसीलवर शेकडो शेतकरी व कार्यकर्त्यांनी धडक दिली. धडक मोर्च्यानंतर झालेल्या जन आंदोलन सभेत बोलताना संदीपदादा शेळके यांनी राज्य सरकार व सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. झालेले प्रचंड नुकसान पाहता पंचनामे, सर्वेक्षण, 'पाहणी पर्यटन' सारखी 'शो बाजी' न करता शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट मदत जमा करा, असे आवाहन त्यांनी केले.
   सोलर पॅनल नुकसानीसाठी १ लाखाची अतिरिक्त मदत द्या, शेडनेट नुकसानीचा 'एनडीआरएफ'मध्ये समावेश करावा, शेडनेट नुकसानग्रस्त शेतकऱ्याला १ लाख रुपये द्या , नुकसंग्रस्तना बागायतीसाठी एकरी ५० हजार, कोरडवाहूसाठी एकरी २५ हजार तत्काळ मदत द्या आदी मागण्यांसाठी सिंदखेडराजा तहसिलवर हे आंदोलन करण्यात आले. राजमाता जिजाऊ जन्मस्थळ ते तहसील कार्यालय असा धडक मोर्चा काढण्यात आला. तहसिलदारांना निवेदन देण्यात आल्यावर परिसरात सभा घेण्यात आली. यावेळी बोलतांना शेळके यांनी सरकार व सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांच्यावर टीकेची झोड उठविली. ओल्या दुष्काळात राजकारणाचा सुकाळ न करता सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मुख्यमंत्रीकडे मागणी करणे काळाची गरज आहे. अवकाळीने झालेले नुकसान प्रचंड आहे. खरीप हातचा गेल्यावर रब्बीवर देखील निसर्गाने घाला घातला आहे. त्यामुळे निकष व पंचनामे याचा खेळ न करता शेतकऱ्यांना मदत करून त्यांचे अश्रू पुसण्याची गरज आहे. खोडा (अनधिकृत) खरेदी करून शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहे. याची नोंद बाजार समित्याकडे असणे बंधनकारक करावे व फसवूनिकीचे खटले फास्ट ट्रक न्यायालयात चालवावे. फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांची संपत्ती जप्त करून शेतकऱ्यांची रक्कम चुकती करण्यात यावी, अशी मागणीही संदिपदादा शेळके यांनी केली. या आंदोलनात शेतकरी, कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले.
* शेड नेटधारकाना न्याय द्या : 
      यावेळी संदीपदादा यांनी पॉली हाऊस आणि शेडनेट धारकांच्या व्यथा मांडल्या. सरकार एकीकडे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा उपदेश करते पण नैसर्गिक आपत्तीत पॉली हाऊस आणि शेडनेट धारकासाठी मदतीची कोणतीच तरतूद नाही . मुळात 'एनडीआरएफ' मध्ये त्यांच्या भरपाईची तरतूदच नाही. त्यामुळे त्यांचे लाखोंचे नुकसान झाले असले तरी मदत मिळणार नाही. जिल्ह्यातील नेत्यांना याची माहिती आहे का आणि ते यावर आवाज उठविणार काय? असा रोखठोक सवाल त्यांनी यावेळी केला.
* शेतकऱ्यांनो वन बुलढाणा मिशन सोबत या : 
       सरकार भांडवलंदारांची करोडो रुपयांची कर्जे माफ करते. मग शेतकऱ्यांना मदत करतांना हात आखडता का घेता ? असा सवाल संदीपदादा शेळके यांनी  यावेळी उपस्थित केला. सरकारने आता निकष, पंचनामे यांचा बाऊ न करता शेतकऱ्यांना सढळ हाताने व तेही तात्काळ मदत करावी, त्यांच्या खात्यात मदत जमा करावी अशी आपली मागणी आहे. मात्र तशी अपेक्षा नसल्याने भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी वन बुलढाणा मिशन सोबत यावे असे आवाहन करून बळीराजाला न्याय मिळवून दिल्या खेरीज स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही संदीपदादा शेळके यांनी यावेळी दिली. लाखोंच्या संख्येतील शेतकऱ्याचा नेत्यांवर, सरकारवर दवाब असला पाहिजे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यावर 'भाऊ, ताई, साहेब' यांचा दवाब आहे. हे चित्र बदलून व हक्क मिळवून घेण्यासाठी पक्षभेद विसरून वन बुलढाणा मिशन च्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.