बुलडाणा नगरपरिषद हद्दवाढ प्रस्ताव रद्द करा*शिवसेना प्रवक्ता ॲड.जयश्री शेळके यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बुलडाणा नगरपरिषद हद्दवाढ प्रस्ताव रद्द करा
*शिवसेना प्रवक्ता  ॲड.जयश्री शेळके यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       शहरालगतच्या काही ग्रामपंचायतींचा समावेश करण्यासाठी मांडण्यात आलेला बुलडाणा नगरपरिषदेचा हद्दवाढ प्रस्ताव तात्काळ रद्द करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात पक्षाच्या प्रवक्त्या ॲड.जयश्री शेळके यांनी आज 5 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे.

          बुलढाणा नगरपरिषदेने सागवन, जांभरुण, येळगाव, सुंदरखेड, माळविहीर या ग्रामपंचायतींचा नगरपालिकेत समावेश करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मात्र या सर्व गावांतील नागरिकांनी या हद्दवाढीस तीव्र विरोध दर्शविला आहे. सध्या बुलडाणा शहरातच नागरिकांना मूलभूत सुविधांचा पुरेसा लाभ मिळत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शहरातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग, सांडपाण्याने भरलेली गटारे तसेच पिण्याच्या पाण्याचा अनियमित पुरवठा अशा समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. अशा परिस्थितीत नव्याने काही ग्रामपंचायतींचा नगरपरिषद हद्दीत समावेश झाल्यास त्या गावांतील नागरिकांनाही मूलभूत सुविधांसाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

        निवेदनात पुढे म्हटले आहे की, नगरपरिषद हद्दवाढीच्या माध्यमातून शहरालगतच्या गावांतील मोक्याच्या जागा व भूखंडांवर डोळा ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विकासाच्या नावाखाली काही व्यक्तींचा वैयक्तिक फायदा साधण्याचा प्रयत्न होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

        भारतीय राज्यघटनेतील ७३ व्या घटनादुरुस्तीनुसार ग्रामपंचायतींना स्वायत्त अधिकार देण्यात आले असून, एखाद्या गावाचा नगरपरिषद हद्दीत समावेश करायचा की नाही याचा अंतिम निर्णय त्या गावातील ग्रामसभा व नागरिकांचा असतो. नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी मागविलेल्या अभिप्रायानुसार सागवन, येळगाव, सुंदरखेड व माळविहीर या ग्रामपंचायतींनी विशेष ग्रामसभा घेऊन ‘हद्दवाढ नामंजूर’चे ठराव बहुमताने मंजूर केले असल्याचेही निवेदनात नमूद आहे.

      तसेच हद्दवाढ प्रस्तावासाठी तहसीलदारांनी दिलेला अहवाल वस्तुस्थितीला धरून नसून नागरी क्षेत्र, अकृषक क्षेत्र व रोजदारीच्या टक्केवारीबाबत प्रत्यक्ष चौकशी न करता चुकीची आकडेवारी सादर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित सर्व गावे लोकसंख्या व उत्पन्नाच्या दृष्टीने सक्षम असून नागरिकांना आवश्यक सुविधा देण्यास समर्थ असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर लोकभावना व कायदेशीर तरतुदी लक्षात घेऊन बुलडाणा नगरपरिषद हद्दवाढीचा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्ता ॲड.जयश्री शेळके यांनी केली आहे.