मेहकर : (एशिया मंच न्यूज )
शहराबाहेरील खामखेड रोडवरील एमआयडीसी परिसरात आढळून आलेल्या युवकाच्या खून प्रकरणाचा छडा अवघ्या १२ तासांत लावत मेहकर पोलिसांनी तपास चक्र वेगाने फिरवल्याने आरोपीला करण्यात यश आले आहे.
सदर घटणेबाबत मिळालेली माहिती अशी की, पोलीस स्टेशन मेहकर येथे ४ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास माहिती मिळाली की, खामखेड रोडवरील एमआयडीसी येथील शेतात एका पुरुष जातीचे प्रेत आढळून आले आहे. सदर माहिती मिळताच पोलिस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांनी आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. प्रथमदर्शनी हा प्रकार घातपाताचा असल्याचे स्पष्ट झाल्याने मृताची ओळख पटविण्याचे काम वेगाने हाती घेण्यात आले. तपासा दरम्यान सदर मृतकाचे नाव राहुल भानुदास बाजड (वय २८ वर्षे, रा. जांब आढाव, ता. रिसोड, जि. वाशीम) असे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून फॉरेन्सिक लॅब, फिंगरप्रिंट तज्ज्ञ तसेच डॉग स्कॉड यांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले.
तपासाच्या सूत्रांना गती देत गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी ओम शामराव केनवडकर (वय ३६ वर्षे, रा. केनवड, ता. रिसोड, जि. वाशीम) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. मृतक हा काही दिवसांपासून आरोपीच्या पत्नीला वारंवार त्रास देत होता. या कारणावरून ३ मार्च २०२६ रोजी आरोपीने मृतकाला मेहकर येथील खामखेड रोडवरील एमआयडीसी परिसरातील शेतात नेऊन दगडाने मारहाण करून त्याचा खून केल्याचे उघड झाले.
या प्रकरणी फिर्यादी संजय किसन वाघ (वय ४० वर्षे, रा. जांब आढाव, ता. रिसोड, जि. वाशीम) यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन मेहकर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक (बुलडाणा) निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर, प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांच्या नेतृत्वात पार पडली. या तपासात सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बिरांजे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक अवचार, पोलीस उपनिरीक्षक गणेश कड, पोलीस उपनिरीक्षक कांचन जारवाल, सहाय्यक फौजदार सुरेश काळे, सुखदेव गव्हाणे, पोलीस हेड कर्मचारी लक्ष्मण कटक, सुखदेव ठाकरे, संजय पवार, प्रभाकर शिवणकर, मोहम्मद परसुवाले, विलास झोटे, अमोल परिहार, इब्राहिम परसुवाले, करिम शहा, शिवानंद तांबेकर, विठ्ठल पैठणे, गजानन लहाने, अशोक घोगे, सुनील देशमुख, विनोद पवार, संदीप भोंडाणे, शिवाजी चिम, आम्रपाली सरकटे, तसेच सायबर पोलिस स्टेशनचे कैलास ठोंबरे व उषा वाघ यांनी अवघ्या १२ तासांत खुनाचा छडा लावत आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे.
