शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा देण्यासाठी कटिबद्ध - सुनील शेळके* राजर्षी शाहू पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा देण्यासाठी कटिबद्ध - सुनील शेळके
* राजर्षी शाहू पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. कृषी क्षेत्रात दररोज आमूलाग्र बदल घडत आहेत. शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाची कास धरुन शेतीत नवीन प्रयोग केले पाहिजेत. राजर्षी शाहू परिवार शेतकऱ्यांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांनी केले. 
       राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्था, राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप- क्रेडिट सोसायटी आणि दिशा महिला अर्बनची सर्वसाधारण सभा 18 सप्टेंबर 2022 रोजी वरवंड येथील कै. वसंतरावजी नाईक वेअर हाऊसमध्ये उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके होते. बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, राजर्षी शाहू मल्टिस्टेटचे कार्यकारी संचालक संदीपदादा शेळके, बुलडाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर, राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालती शेळके, डोंगरखंडाळाचे उपसरपंच तथा संस्थेचे संचालक श्याम पाटील सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
        पुढे बोलतांना सुनील शेळके म्हणाले, गेल्या २० वर्षांपासून राजर्षी शाहू परिवार तळागाळातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे. ठेवीदार, खातेदार, ग्राहकांचा विश्वास हेच संस्थेचे सर्वात मोठे भांडवल आहे. अभिता कंपनीची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. अभिता ही जमीन व मालमत्ता क्षेत्रातील सर्व प्रकारच्या सेवा एकाच छताखाली व १०० टक्के ऑनलाइन सेवा पुरवणारी एकमेव कंपनी आहे. नागरिकांना मालमत्ता आणि यंत्रसामग्री मूल्यांकन, नोंदणी, मालमत्ता आणि सर्व प्रकारचे विमा, ड्रोनद्वारे अचूक जमीन मोजणी, उत्तराधिकारी आणि वारस प्रमाणपत्र तत्काळ आदी सेवा पुरवण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
       बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी सहकार क्षेत्राची व्याप्ती आणि सहकाराचे महत्व विषद केले. तसेच राजर्षी शाहू परिवार राबवत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.  
         राजर्षी शाहू मल्टिस्टेटचे कार्यकारी संचालक संदीपदादा शेळके म्हणाले की, येणारा काळ कृषी क्षेत्राचा आहे. शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला अच्छे दिन येणार आहेत. ग्रामीण भागात दळणवळणाची चांगली सोय झाली आहे. त्यामुळे शेतीवर आधारित उद्योगधंदे विकसित होणार आहेत. राजर्षी शाहू परिवाराने काळाची पाऊले ओळखून शेतकऱ्यांसाठी १० हजार मेट्रिक टन क्षमतेच्या कोल्ड स्टोअरेजचे निर्माण कार्य हाती घेतले आहे. कोल्डस्टोअरेजचे भुमिपूजन आणि ९ हजार मेट्रिक टन क्षमतेच्या दोन वेअर हाऊसचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाल्याचा आनंद आहे. शेतकऱ्यांना भविष्यात यापेक्षाही चांगल्या सुविधा उपलब्ध करु, असे आश्वासन त्यांनी दिले. इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला संस्थेचे सर्व संचालक तसेच राज्य आणि राज्याबाहेरील ठेवीदार, खातेदार, ग्राहक, कर्मचारी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचलन राजर्षी शाहू फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष शैलेशकुमार काकडे यांनी केले आभार सरव्यवस्थापक नितीन उबाळे यांनी मानले. 
वॉटर एटीएमचा शुभारंभ
        परिसरातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने वॉटर एटीएमचा शुभारंभ यावेळी संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके यांच्या हस्ते करण्यात आला. वॉटर एटीएममुळे वरवंडवासीयांची सोय झाली आहे. शेतकरी आणि नागरिकांसाठी भविष्यातही चांगल्या योजना राबविण्यात येतील, असे अभिवचन भाऊसाहेब शेळके यांनी दिले.