डोंगरखंडाळा येथील विराज स्टड फार्मच्या घोड्यास तमिळनाडूत मागणी

डोंगरखंडाळा येथील विराज स्टड फार्मच्या घोड्यास तमिळनाडूत मागणी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
        बुलडाणा शहरापासून अवघ्या 14 कि.मी.अंतरावर असलेले डोंगरखंडाळा या ठिकाणी दर्जेदार मारवाडी अश्व प्रजातीचे संवर्धन केंद्र विराज स्टड फार्म या नावाने सुरु करण्यात आला. याच विराज स्टड फार्म, डोंगरखंडाळा चा घोडा तमिळनाडू मध्ये चांगल्या किंमतीत विक्री करण्यात आला. या घोड्याला  दि.20 सप्टेंबर 2022 रोजी संस्थेचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेशजी झंवर व सौ.कोमलताई झंवर यांच्या शुभहस्ते निरोप देण्यात आला.
      यावेळी फार्म चे श्रीकांत देशमुख यांनी सांगितले की, या अश्व संवर्धन केंद्रातील मारवाडी प्रजातीचे प्रजनन, संवर्धन व अश्व सौंदर्य स्पर्धा अशा प्रकारचे कार्य
केले जाते. अश्व हे भारतीय गौरवशाली सांस्कृतिक परंपराचे प्रतिक आहे. परंतु आधुनिक जीवनशैली व तंत्रज्ञान विकासामुळे हा अश्व संस्कृतीचा वारसा लोप पावत चालला आहे. मारवाडी अश्व प्रजाती ही भारतीय उपखंडात दुर्मिळ प्रजाती आहे. या प्रजातीचे संवर्धन केंद्र डोंगरखंडाळा येथे सुरू झाल्यामुळे परिसरातील व
जिल्ह्यातील अश्वप्रेमीसांठी आनंदाची बाब आहे.
        बुलडाणा जिल्ह्यातील अश्वसंघ हा एक सामुहिक उपक्रम असुन यामध्ये बुलडाणा येथील श्रीकांत देशमुख, विशाल शेळके, विनायक भाग्यवंत, आयुष चौधरी, गोविंद देव्हडे, अजिंठा येथील निलेश राजपूत यांचा सहभाग आहे. तर अश्व संवर्धनाच्या व्यवस्थापनाची 
जवाबदारी श्रीकांत देशमुख व जितेंद्र अंभोरे यांची आहे.
         भारतामध्ये सारंगखेडा (महाराष्ट्र), पुष्कर (राजस्थान),  माळेगाव (नांदेड), येवला (महाराष्ट्र) या ठिकाणी मारवाडी अश्वांचा बाजार भरतो. बाजारात
उठावदार, दर्जेदार, बांधा असणाऱ्या उंच पुऱ्या व देखण्या अश्वांची मागणी असते.उत्कृष्ट  शारीरिक ठेवण व सौंदर्य असणाऱ्या अश्वांना लाखो रुपयांची मागणी मिळते. यासाठी संवर्धनामध्ये आहार, कसरत व प्रशिक्षणावर विशेष लक्ष द्यावे लागते. विराज स्टड
फार्म मध्ये या सर्व बाबींकडे लक्ष दिल्या जाते.
       मारवाडी अश्व सौंदर्य स्पर्धा- यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा पुणे, अहमदाबाद, सारंगखेडा, फरिदकोट,अकलूज, पुष्कर, जोधपूर  इत्यादी ठिकाणी अश्व सौंदर्य भरविण्यात येतात. देशभरातून विविध राज्यातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होतात. या स्पर्धेत विजेत्या अश्वांना बाजारात विशेष मागणी असते.
विराज स्टड फार्म तर्फे शानवीर या अश्वाने पुणे अकलूज या अश्वस्पर्धेत प्रथम स्थान पटकावून आपला एक 
वेगळा ठसा उमटवला आहे.
      या स्टड फार्म ला संस्थेचे अध्यक्ष श्री राधेश्याम चांडक यांनी नुकतीच भेट दिली. व अश्वांची पाहणी केली. या उपक्रमासाठी त्यांनी भविष्यात अधिक दर्जेदार कार्यासाठी आवश्यक ती मदत, सुचना व मार्गदर्शन केले. तसेच भविष्यात डोंगरखंडाळा येथे राष्ट्रीय अश्व सौंदर्य स्पर्धा भरविण्यासाठी आवश्यक सहकार्य व नियोजन
करण्याची ग्वाही दिली. डोंगरखंडाळा ही भाईजींची मातृभूमी असल्यामुळे स्वगृही असा उपक्रम सुरू झाल्यामुळे त्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले.