राजर्षी शाहू पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार

राजर्षी शाहू पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
        महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीत दीपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक कार्य केल्याबद्दल राजर्षी शाहू ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे मानाचा दीपस्तंभ पुरस्कार देण्यात आला आहे. संस्थेला अमरावती विभागातून तिसरा क्रमांक मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपती पुळे येथे 19  सप्टेंबर 2022 रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 
       सहकार चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या पतसंस्थांना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे दरवर्षी मानाचा दीपस्तंभ पुरस्कार दिला जातो. यावर्षी राजर्षी शाहू ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला अमरावती विभागातून तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव यांच्या हस्ते गणपतीपुळे येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
     राजर्षी शाहू ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची स्थापना भाऊसाहेब शेळके यांनी २००२ मध्ये केली. शिरपूरसारख्या एका खेड्यात लावलेल्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. ठेवीदार, खातेदार, ग्राहक यांच्या विश्वासाच्या बळावर संस्थेने २० वर्षे पूर्ण केली आहेत. ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासोबतच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यास संस्थेचे प्राधान्य राहिले आहे. पतसंस्थेला मिळालेल्या पुरस्काराने अधिक जोमाने कार्य करण्यास बळ मिळाल्याची प्रतिक्रिया राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी व्यक्त केली.