चिखली : (एशिया मंच न्यूज )
मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्यात पिकांसाठी घातक अशा हुमणी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तरी या हुमणी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकर्यांना कृषि विभागामार्फत मोफत औषधी व किटकनाशके उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी उध्दव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे जिल्हाप्रमुख नंदु कर्हाडे यांनी तहसिलदार यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, बुलढाणा जिल्ह्यातील हजारों हेक्टर क्षेत्रावरील पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे शेतकर्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. शेतकर्यांनी नगदी पिक म्हणून सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे. आणि याच पिकावर हुमणी अळीमुळे सोयाबीन पिकांना धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी शेतकरी वर्ग विविध बँकांचे कर्ज घेवून पिकांची पेरणी करीत असतो. मात्र यावर्षी हजारो हेक्टरमधील पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. तरी हुमणी अळीमुळे झालेल्या नुकसानीचा तलाठी, कृषि सहाय्यक, ग्रामसेवक यांच्यामार्फत तत्काळ पंचनामे करुन नैसर्गिक आपत्ती किंवा विशेष बाब म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्यांना पॅकेज जाहिर करुन शेतकर्यांना मदतीचा हात द्यावा. या हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी शेतकर्यांना मोफत किटकनाशक व औषधी उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणीही निवेदनात नमुद आहे. निवेदन देते वेळी त्यांच्यासोबत शिवसैनिक प्रितम गैची यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.