* अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निशाताई घोडे तर सचिवपदी संगिता मादनकर
चिखली : (एशिया मंच न्युज)
अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या (सीटू संलग्न) चिखली तालुकाध्यक्षपदी निशाताई घोडे तर सचिवपदी संगिता मादनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात २८ जून रोजी अधिवेशन संपन्न झाले. अधिवेशनाच्या निमित्ताने चिखली तालुका कमिटीची निवड करण्यात आली. तसेच बीटनिहाय पदाधिकाऱ्यांची निवड सूद्धा करण्यात आली. या बीट पदाधिकाऱ्यांमधून तालुका कमिटीची निवड करण्यात आली. त्यामधे तालुकाध्यक्ष म्हणून निशाताई घोडे तर सचिवपदी संगीता मादनकर, कोषाध्यक्ष मंदा डोंगरदिवे, उपाध्यक्ष कल्पना गवई यांच्या सोबतच २५ सदस्यांची तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली.
जिल्हा सचिव प्रतिभा वक्टे, जिल्हा उपाध्यक्ष मंदाताई डोंगरदिवे यांनी मार्गदर्शन केले. अश्विनी वांजूळे, केवटताई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना येणाऱ्या दैनंदिन अडचणी, त्यांच्या समस्या यावर प्रतिभा वक्टे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कॉ.पंजाबराव गायकवाड यांनी ९ जुलै रोजी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने आयोजित कामगार विरोधी ४ श्रमसंहितेला विरोध करण्यासाठी जो एकदिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. तो १००% यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी गावपातळीवरील इतरही योजना कर्मचार्यांना सोबत घेऊन जोरदार तयारी करावी, असे आवाहन केले. सूत्रसंचालन निशाताई घोडे यांनी केले.