देऊळगाव राजा तालुक्यातील १० सहकारी संस्थांची नोंदणी रद्द होणार* हरकती नोंदवण्यासाठी १० दिवसांची मुदत

देऊळगाव राजा तालुक्यातील १० सहकारी संस्थांची नोंदणी रद्द होणार
* हरकती नोंदवण्यासाठी १० दिवसांची मुदत
 

देऊळगाव राजा : (एशिया मंच न्यूज )
        तालुक्यातील अवसायनात काढण्यात आलेल्या १० सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सहकार विभागाने सुरू केली आहे. या संस्थांची नोंदणी अंतिमरीत्या रद्द करण्यापूर्वी संबंधित व्यक्ती, धनको, ऋणको आणि नागरिकांकडून हरकती व दावे मागविण्यात आले आहेत.

      महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम १०९ मधील तरतुदींनुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे. संबंधित संस्थांकडे कोणाचे आर्थिक देणे-घेणे शिल्लक असल्यास किंवा संस्थांची नोंदणी रद्द करण्याबाबत कोणाची हरकत अथवा आक्षेप असल्यास, त्यांनी प्रसिद्धिपत्रक प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत लेखी स्वरूपात आपले म्हणणे नोंदवावे.

      या प्रक्रियेत प्रामुख्याने दूध उत्पादक सहकारी संस्था, शेळी-मेंढीपालन सहकारी संस्था आणि कुक्कुटपालन सहकारी संस्थांचा समावेश आहे. हरकती सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), प्रशासकीय इमारत, बुलढाणा या कार्यालयात सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

        निर्धारित मुदतीत कोणतीही हरकत प्राप्त न झाल्यास संबंधितांचे काही म्हणणे नाही, असे गृहीत धरून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम १०९ व २१ अन्वये संबंधित संस्थांची नोंदणी कायमस्वरूपी रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक निबंधक सुभाष मो. राठोड यांनी दिली.