दुष्काळात राजर्षी शाहू शेतकऱ्यांच्या पाठीशी : संदीपदादा शेळके * निमखेड येथे मोफत आरोग्य शिबिराचा 240 रुग्णांना लाभ

दुष्काळात राजर्षी शाहू शेतकऱ्यांच्या पाठीशी : संदीपदादा शेळके 
* निमखेड येथे मोफत आरोग्य शिबिराचा 240 रुग्णांना लाभ 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         पावसाने दगा दिल्याने यंदा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. शेती संकटात सापडली आहे. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा संकटसमयी राजर्षी शाहू मल्टीस्टेट शेतकरी, कष्टकऱ्यांच्या सदैव पाठीशी आहे, असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी केले.  
        नांदुरा तालुक्यातील निमखेड येथे 14 ऑक्टोबर रोजी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ संदीपदादा शेळके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मंचावर युवा नेते प्रविण पाटील, सरपंच राजू उमाळे, पोलीस पाटील श्रीकृष्ण पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. महामानवांच्या प्रतिमांचे पुजन करुन शिबिराला सुरुवात करण्यात आली. दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी, शेतमजूर व गरजू नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. पुढील दहा महिने आरोग्य शिबिरे सुरू ठेवण्यात येणार आहे. गरजू रुग्णांच्या पुढील उपचारांसाठीही नियोजन करण्यात आले आहे. या शिबिरात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. माधुरी धोरण, जनरल फिजिशियन डॉ. आकाश पाटील, डॉ. गवई , सर्जन डॉ. विनोद हागे, अस्थीरोग तज्ञ डॉ. माने, हृदयरोगतज्ञ डॉ. चेतन जाधव यांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले. दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकरी, शेतमजूर व गरजू नागरिकांना आरोग्यसेवेचा आधार देण्यासह त्यांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात पुढे करण्याचा राजर्षी शाहू परिवाराचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरत आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता भविष्यात जलसंधारणाची कामे व जनावरांच्या चारा छावणीचे काम हाती घेण्याचा मानस संदीपदादा शेळके यांनी व्यक्त केला. यावेळी ग्रामस्थ तसेच राजर्षी शाहू मल्टीस्टेट, वन बुलडाणा मिशन, राजर्षी शाहू फाउंडेशनचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


* ऑपरेशन खर्चात सवलत :
     आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. शरीर तंदुरुस्त असेल तर मानसिक स्वास्थ सुध्दा चांगले राहते. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या 100 शाखांच्या माध्यमातून नियमितपणे आरोग्य शिबिरे घेण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टरांसह इतर जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टर्स सुध्दा सेवा देणार आहेत. शिबिरानंतर पुढील तपासणी, औषधी व ऑपरेशन खर्चात सवलत मिळवून देण्यात येणार आहे. किंबहुना हा खर्च मोफत कसा करता येईल, यावर राजर्षी शाहू मल्टीस्टेट काम करणार आहे, असे संदीपदादा शेळके यांनी सांगितले.