५ हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा !* हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्या; अन्यथा आंदोलन अटळ – रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा

५ हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा !
* हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्या; अन्यथा आंदोलन अटळ – रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
      दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची मदत देण्याच्या घोषणेवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तुलनेत अत्यंत तुटपुंजी असल्याचे सांगत त्यांनी हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.
“आम्हाला भिकारी समजता का? आम्ही पेरा केला नाही, तर तुम्ही काय खाणार धतुरा?” असा सवाल करत तुपकर यांनी सरकारच्या मदतीच्या घोषणेवर टीका केली. शेतीसाठी बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि मशागतीवर मोठा खर्च होतो. मात्र, पिकांचे नुकसान झाल्यानंतर पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांना कसा दिलासा मिळणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
       पाच हजार रुपये आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही वर्षभर आमच्याकडे राहून दाखवा आणि याच पैशांत संसार चालवून दाखवा, असे आव्हानही त्यांनी सरकारला दिले.
     शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचार करून हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी तुपकर यांनी केली. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास गावागावांतून शेतकरी एकत्र येऊन मोठे आंदोलन उभारतील, असा इशाराही त्यांनी दिला.