शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातही प्रा. डी. एस. लहाने सरांचा डंका !* शिवसाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, सहकार आणि रोजगारनिर्मितीत उल्लेखनीय योगदान; अमरावती शिक्षक मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात

शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातही प्रा. डी. एस. लहाने सरांचा डंका !
* शिवसाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, सहकार आणि रोजगारनिर्मितीत उल्लेखनीय योगदान; अमरावती शिक्षक मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
      अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरलेले प्राध्यापक डी. एस. लहाने सर यांनी शिक्षण आणि सहकार क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, शिक्षकांच्या समस्यांची जाण आणि सहकार क्षेत्रातील यशस्वी वाटचाल ही त्यांच्या कार्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. सुस्वभावी व्यक्तिमत्त्व आणि विविध क्षेत्रांतील अनुभवाच्या बळावर त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
        त्यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यात शिक्षण आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिवसाई संस्थेचा विस्तार वेगाने होत आहे. सन २००६ मध्ये बुलढाणा येथे स्थापन झालेल्या शिवसाई नागरी सहकारी पतसंस्थेने अवघ्या तीन लाख रुपयांच्या भांडवलातून आपली वाटचाल सुरू केली. आज या पतसंस्थेच्या जिल्हाभरात २५ शाखा कार्यरत असून, संस्थेच्या माध्यमातून सुमारे १५० महिला व पुरुषांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. अल्प भांडवलातून सुरू झालेल्या संस्थेचा हा विस्तार त्यांच्या संघटन कौशल्याची आणि व्यवस्थापन क्षमतेची साक्ष देणारा ठरतो.
 
सामान्य विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाचे व्यासपीठ
          ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माफक शुल्कात दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने बुलढाणा तालुक्यातील सागवन आणि मासरूळ येथे ‘शिवसाई ज्ञानपीठ’ सुरू करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ हजारो सामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना होत आहे. विशेष म्हणजे, विधवा महिलांच्या मुलांना येथे मोफत शिक्षण दिले जाते. त्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात अडथळे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही संस्था आधार ठरत आहे.
      शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबतच नीट (NEET), सीईटी (CET) यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीवर आणि क्रीडा स्पर्धांतील सहभागावरही संस्थेने भर दिला आहे. या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत प्रगतीच्या संधी उपलब्ध होत आहेत.
जेईई, नीटसाठी राष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शन
       नवज्योत शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून संचालित ‘शिवसाई युनिव्हर्सल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बुलढाणा’ येथे आयआयटी फाउंडेशनसह जेईई आणि नीट परीक्षांच्या तयारीसाठी राष्ट्रीय स्तरावरील प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे बुलढाण्यातील विद्यार्थ्यांना कोटा आणि लातूरसारख्या शैक्षणिक केंद्रांच्या धर्तीवर स्पर्धा परीक्षांच्या तयारीची सुविधा उपलब्ध झाली आहे.
संस्थेच्या माहितीनुसार, या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आतापर्यंत १०० पेक्षा अधिक विद्यार्थी एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविण्यात यशस्वी झाले आहेत, तर अनेक विद्यार्थी आयआयटीमध्ये शिक्षण घेत आहेत. ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीही पुढाकार
       आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जानेफळ, ता. मेहकर येथे शिवसाई अनुदानित आश्रमशाळेची स्थापना करण्यात आली आहे. या आश्रमशाळेत सध्या ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने संस्थेचा हा उपक्रम महत्त्वाचा ठरतो.

विविध पदांच्या माध्यमातून कार्याचा विस्तार
      प्रा. डी. एस. लहाने यांनी विविध संस्थात्मक आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळताना शिक्षण, सहकार आणि संघटनात्मक क्षेत्रात योगदान दिले आहे. त्यांनी भूषविलेली प्रमुख पदे पुढीलप्रमाणे आहेत.

* जिल्हा सहसंपर्कप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
*जिल्हा परिषद सदस्य
* संस्थापक, शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, बुलढाणा
* संस्थापक, मानस फाउंडेशन, बुलढाणा
* अध्यक्ष, शिवसाई ज्ञानपीठ व युनिव्हर्सल स्कूल, बुलढाणा
* सचिव, शिवसाई आश्रमशाळा, जानेफळ, ता. मेहकर, जि. बुलढाणा
* विभागीय अध्यक्ष, इंग्लिश स्कूल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य
* विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना

       शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, सहकार क्षेत्रातील संस्थात्मक उभारणी, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा निर्माण करण्याच्या कार्याच्या पार्श्वभूमीवर प्रा. डी. एस. लहाने यांनी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आपली दावेदारी सादर केली आहे. शिक्षकांच्या प्रश्नांची जाण आणि विविध क्षेत्रांतील अनुभवाच्या बळावर ते शिक्षक मतदारांसमोर आपली भूमिका मांडत आहेत.