चिखलीच्या विनायकचा दिल्लीतील राष्ट्रीय पर्यावरण बाल संसदेत आवाज घुमला!
* विनायक मापारीच्या कामगिरीने बुलढाणा, चिखलीसह लोणारच्या मानात मानाचा तुरा
चिखली : (एशिया मंच न्यूज )
राष्ट्रीय स्तरावरील पर्यावरण बाल संसद २०२६ मध्ये दिल्ली येथे सहभागी होत पर्यावरण विषयाची प्रभावी मांडणी करणाऱ्या चिखलीच्या विनायक राजेश मापारी याने आपल्या कौतुकास्पद कामगिरीने बुलढाणा जिल्ह्याची मान उंचावली आहे. त्याच्या या यशामुळे चिखली शहरासह लोणारमध्येही आनंदाचे वातावरण असून, विनायकवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विनायक राजेश मापारी हा बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिरात इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत आहे. त्याचे वडील राजेश मापारी हे चिखली येथे पोलीस विभागात कार्यरत असून, ते मूळचे लोणार येथील रहिवासी आहेत. त्यामुळे विनायकच्या या उल्लेखनीय यशाने चिखली, बुलढाणा आणि लोणार या तिन्ही ठिकाणांचा नावलौकिक वाढला आहे.
दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय पर्यावरण बाल संसद २०२६ मध्ये विनायकने पर्यावरण या महत्त्वपूर्ण विषयाची आपल्या अनोख्या शैलीत प्रभावी मांडणी केली. त्याच्या या कामगिरीतून पर्यावरणाबाबतची जागरूकता आणि विद्यार्थ्यांमधील सामाजिक भान अधोरेखित झाले. त्याचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.
आपल्या यशाचे श्रेय विनायकने आई-वडील तसेच शिक्षकवृंदांना दिले आहे. योग्य मार्गदर्शन, कुटुंबाचा पाठिंबा आणि स्वतःची जिद्द यांच्या बळावर त्याने राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे. विनायकच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक विद्याधर महाले, नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या चिखली विधानसभा संपर्कप्रमुख डॉ. सौ. ज्योतीताई खेडेकर आणि चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार भूषण गावंडे यांनी त्याचा सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विनायकच्या या यशामुळे त्याच्या शाळेचा नावलौकिक वाढला असून, त्याच्या पुढील शैक्षणिक आणि सामाजिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
