* जयस्तंभ चौकात दुष्काळी GR ची होळी; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
मागील जवळपास ५० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभी पिके करपण्याची वेळ आली असताना सरकार मात्र शेतकऱ्यांच्या या गंभीर परिस्थितीकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्त्या ॲड.जयश्रीताई शेळके यांनी केला.
शेतकरी हवालदिल झालेला असताना सत्ताधाऱ्यांकडून आढावा बैठकींच्या नावाखाली काजू-बदाम खाण्याची राजेशाही व्यवस्था आणि त्यानंतर झालेली दौऱ्यांची नौटंकी यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम झाले आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदतीची गरज असताना सरकारने केवळ पंचनाम्यांचा GR काढून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सरकारने दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंचनाम्यांचा GR काढला असला, तरी शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी येणार, हा खरा प्रश्न आहे. पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा करायला लावण्यापेक्षा सरकारने तातडीने ठोस आर्थिक मदत जाहीर करावी. पावसाच्या खंडामुळे आणि पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये पीकनुकसान भरपाई तातडीने जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्याने पिकासाठी पैसा खर्च केला, कर्ज काढले, दिवसरात्र कष्ट केले आणि ऐन हंगामात पावसाने दडी मारली. अशा वेळी सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे अपेक्षित आहे. मात्र, सरकार पंचनामे, बैठका आणि दौऱ्यांच्या नौटंकीत व्यस्त आहे. पंचनाम्यांचा कागद शेतकऱ्याचे नुकसान भरून काढू शकत नाही. शेतकऱ्याच्या खात्यात प्रत्यक्ष मदत जमा झाली पाहिजे, असा हल्लाबोल ॲड. जयश्री शेळके यांनी केला.
हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करा, पंचनाम्यांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष नुकसानभरपाई जमा करा, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारने आणखी दुर्लक्ष केल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अधिक तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, सरकारच्या पंचनाम्यांच्या GR चा आणि शेतकऱ्यांप्रती सरकारच्या उदासीन भूमिकेचा निषेध म्हणून जयस्तंभ चौक, बुलढाणा येथे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत आणि ॲड. जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वाखाली पंचनाम्यांच्या GR ची प्रत जाळण्यात आली. शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत GR ची होळी करून सरकारच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पंचनाम्यांची नौटंकी नको, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत द्या ; हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई जाहीर करा!” अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, जिल्हा संघटक सुमित सरदार, तालुकाप्रमुख विजय इतवारे, शहर संपर्कप्रमुख सुनिल भाग्यवंत, शहरप्रमुख विजय राऊत, उपशहर प्रमुख गजानन गवई, युवासेना शहरप्रमुख मनोज चंदन, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख पियंका पिंपळे, उपतालुकाप्रमुख भावना पाटील, सुनंदा खरात, सुधाकर मुंढे, निलेश तायडे, निलेश हरकल, दिलीप राजभोग, शेख रफीक, श्रीकांत जाधव, निलेश पाटील, सागर तायडे, विनोद तायडे, सतिष राजपूत, केशव भोलाने, गजानन सुरडकर, अनिता गायकवाड, अर्चना शेळके, स्मिता वराडे, शितल सुरडकर, सोनाली वाघ यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
