शाळेच्या इमारतीसाठी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात* निधी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यावर गावकरी ठाम

शाळेच्या इमारतीसाठी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात
* निधी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यावर गावकरी ठाम
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        डोंगर खंडाळा येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीसाठी निधी मंजूर करावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी २१ सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. शाळेच्या इमारतीसाठी पुरेसा निधी मंजूर होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

         डोंगर खंडाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची जुनी इमारत जीर्ण झाली आहे. टिनशेडयुक्त खोल्यांमध्ये सुरू असलेल्या या शाळेच्या इमारतीला भेगा पडल्या असून छतही गळू लागले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांचे वर्ग गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री संभाजी राजे विद्यालयाच्या इमारतीत भरविले जात आहेत.

           विद्यार्थ्यांना दररोज पायी ये-जा करावी लागू नये, यासाठी शिक्षकांकडून स्वखर्चातून खासगी वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी दरमहा सुमारे १० हजार रुपये प्रवासभाडे शिक्षक देत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
शाळेसाठी पक्की इमारत उभारण्यासाठी निधी मंजूर करावा, या मागणीसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदने दिली. मात्र, मागणीची दखल न घेतल्याने अखेर २१ सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले.

* निधी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच :
          शाळेच्या नवीन इमारतीसाठी पर्याप्त निधी मंजूर होईपर्यंत अन्नत्याग आंदोलन अविरत सुरू ठेवण्याचा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.