* काँग्रेसला करणार रामराम.. अन , भाजपात करणार प्रवेशाचा श्री गणेशा...
चिखली : (एशिया मंच न्यूज )
चिखली मतदार संघात राजकीय हालचालींना वेग आला असून गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे. मतदार संघाच्या राजकारणातील एक महत्त्वाची घडामोड समोर आली असून काँग्रेसचे माजी आमदार तथा माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे सोशल मीडियाद्वारे जाहीर केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. अखेर रविवारी त्यांनी आपला निर्णय सोशल मीडियावर व्हिडिओ द्वारे जाहीर केला. अनंत चतुर्थीच्या पूर्व संधेवर राहुल बोंद्रे मुंबई येथे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच चिखली मतदार संघाच्या विकास कन्या श्वेताताई महाले पाटील यांच्या विशेष उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचे वृत्त आहे.
राहुल बोंद्रे यांची राजकीय जडणघडण काँग्रेस पक्षातच झाली असताना काँग्रेस पक्षाने त्यांना नगराध्यक्ष पदापासून तर आमदार पदापर्यंत पोहोचविले. यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास काँग्रेस पक्षातच गेलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मतदार संघातील नागरिक, सहकारी आणि कार्यकर्त्यांसोबतचे संबंध कायम ठेवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशामुळे चिखलीसह तालुक्यातील राजकारणामध्ये काय घडामोडी घडतात याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून सहकार क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बाजार समितीचे सभापती हे काय निर्णय घेतात याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.
