शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे : आमदार श्वेताताई महाले


शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे : आमदार श्वेताताई महाले
चिखली : (एशिया मंच न्यूज )
        चिखली विधानसभा मतदार संघात पावसाच्या अभावी सोयाबीनसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार श्वेताताई महाले यांनी चिखलीचे तालुका कृषी अधिकारी यांच्यासमवेत वैरागड येथे जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

         यावेळी आमदार श्वेताताई महाले म्हणाल्या की, शेतकरी हा राज्य सरकारच्या केंद्रस्थानी असून, शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात महाराष्ट्र सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांचे नुकसान, त्यांच्या समस्या आणि त्यांना मिळणारी मदत याबाबत शासन संवेदनशीलतेने निर्णय घेत आहे. दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने विविध माध्यमांतून चिखली तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश झाला नसून काही भागांचा समावेश झालेला असल्याच्या बातम्या व अफवा पसरत आहेत. शेतकऱ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आमदार श्वेताताई महाले यांनी केले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपली चर्चा झाली असून, चिखली विधानसभा मतदार संघातील चिखली व बुलढाणा तालुक्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना दुष्काळी निकषांच्या कक्षेत आणण्यासाठी शासनस्तरावर सकारात्मक कार्यवाही सुरू आहे. लवकरच याबाबत आवश्यक निर्णय होईल, असे आश्वासन आमदार श्वेताताई महाले यांनी शेतकऱ्यांना दिले.

* संकटकाळी आधार देण्याची जबाबदारी : 
        शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती समजून घेणे, त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवणे आणि संकटाच्या काळात त्यांना आधार देणे हीच आपली जबाबदारी आहे, असेही आमदार श्वेताताई महाले यांनी स्पष्ट केले. पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.