महात्मा फुले यांच्या शैक्षणिक मुक्तीच्या विचारांचे पुनरावलोकन करण्यासाठी ‘सत्यशोधक Conclave 2026’चे आयोजन* उद्घाटन होणार सुनिल शेळके यांच्याहस्ते

महात्मा फुले यांच्या शैक्षणिक मुक्तीच्या विचारांचे पुनरावलोकन करण्यासाठी ‘सत्यशोधक Conclave 2026’चे आयोजन
* उद्घाटन होणार सुनिल शेळके यांच्याहस्ते

पुणे : (एशिया मंच न्यूज )
        महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त आणि सत्यशोधक समाज स्थापना दिनाच्या प्रसंगी पुणे येथे ‘सत्यशोधक Conclave 2026’चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मालधक्का चौक, पुणे येथे मा.उपजिल्हाधिकारी तथा चित्रपट निर्माते सुनिल शेळके यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.

        ‘महात्मा फुले यांच्या शैक्षणिक मुक्तीचा विचार आणि आजच्या संकटातील अंधकारमय सार्वजनिक शिक्षण : एक पुनरावलोकन’ या विषयावर Conclaveमध्ये विचारमंथन होणार आहे. महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात शिक्षणाची ज्योत पेटवून समाजातील वंचित घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. शिक्षण हे केवळ ज्ञानाचे साधन नसून सामाजिक मुक्ती, समता आणि परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, हा विचार त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून मांडला.

       फुले दांपत्याने सुरू केलेल्या शैक्षणिक क्रांतीचा वारसा पुढे छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणमहर्षी पंजाबराव देशमुख यांसारख्या अनेक परिवर्तनवादी नेतृत्वाने पुढे नेला. या संघर्षातून महाराष्ट्रात बहुजन, वंचित आणि ग्रामीण समाजासाठी शिक्षणाच्या नव्या संधी निर्माण झाल्या.

        मात्र आजच्या काळात सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेची अवस्था, शिक्षणाचे वाढते व्यापारीकरण, गुणवत्तापूर्ण शिक्षणातील असमानता आणि गरीब, ग्रामीण व वंचित विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने यांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. ज्या शिक्षणव्यवस्थेला फुले यांनी सामाजिक मुक्तीचे माध्यम मानले, तीच व्यवस्था आज सर्वांसाठी समान आणि गुणवत्तापूर्ण राहिली आहे का, हा प्रश्न या Conclaveच्या केंद्रस्थानी राहणार आहे.

        महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचा उत्सव साजरा करताना केवळ त्यांच्या कार्याचा गौरव न करता फुले यांच्या विचारांचे अवलोकन, आजच्या परिस्थितीचे आत्मपरीक्षण आणि भविष्यातील वाटचालीची दिशा निश्चित करण्याचा प्रयत्न या Conclaveच्या माध्यमातून केला जाणार आहे.

        या कार्यक्रमाचे उद्घाटन ‘सत्यशोधक’ चित्रपटाचे निर्माते सुनील शेळके यांच्या हस्ते होणार आहे. BBC मराठीचे संपादक अभिजित कांबळे आणि ‘द सत्यशोधक’चे संपादक व University of Pennsylvania येथील संशोधक विद्यार्थी तेजस हरड हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पुणे महानगरपालिकेच्या मुख्य विधी अधिकारी ॲड. निशा दाभाडे-चव्हाण असणार आहेत. सामाजिक विषयांवर रॅपच्या माध्यमातून भाष्य करणारे कर्नाटक येथील हरीश कांबळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

      “महात्मा फुले यांच्या विचारांचा केवळ उत्सव साजरा करणे पुरेसे नाही; त्यांनी शिक्षण आणि सामाजिक मुक्तीच्या माध्यमातून उपस्थित केलेले प्रश्न आजच्या काळात समजून घेऊन त्यावर कृती करण्याची गरज आहे. सार्वजनिक शिक्षण व्यवस्था वाचविणे आणि सामाजिक न्यायाची दिशा अधिक मजबूत करणे, यासाठी नव्या पिढीमध्ये संवाद निर्माण करणे हा ‘सत्यशोधक Conclave 2026’चा प्रमुख उद्देश आहे,” अशी माहिती सत्यशोधक Conclave आयोजन समितीच्यावतीने राम वाडीभष्मे, वर्षा वेलाडी, प्रकाश सूर्यवंशी, अनिकेत साळवे, पूजा सूर्यवंशी, अभिषेक शेलकर, ताजुल मेश्राम, प्रशांत कांबळे, कल्याणी राठोड यांनी दिली.

        सत्य, समता, शिक्षण, युवा आणि सामाजिक न्याय या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात येणाऱ्या या Conclaveला विद्यार्थी, युवक, शिक्षक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था-संघटना आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.