मेहकर : (एशिया मंच न्यूज )
जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हिंगोलीच्या सून सौ. श्वेता सुमित खंडारे (सरकटे) यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. त्यांची जिल्हा परिषद यवतमाळ येथे प्राथमिक शिक्षिका पदी निवड झाली आहे. हे यश म्हणजे केवळ एक नोकरी मिळवणे नसून, एका गृहिणीच्या संघर्षाचा, जिद्दीचा आणि स्वप्नांवर असलेल्या अढळ विश्वासाचा विजय मानला जात आहे.
खंडारे परिवाराला दीर्घ काळापासून लाभलेली शिक्षकी पेशाची उज्ज्वल परंपरा सौ. श्वेता यांनी स्वतः शिक्षक पदावर विराजमान होऊन यशस्वीपणे पुढे चालवली आहे. ही कौटुंबिक परंपरा केवळ जपलीच नाही, तर ती नव्या ध्येयाने पूर्ण केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक आणि अभिमान व्यक्त केला जात आहे.
लग्नानंतर संसाराची जबाबदारी अंगावर पडल्यानंतर अभ्यास सुरू ठेवणे हे कोणत्याही महिला उमेदवारासाठी मोठे आव्हान असते. कौटुंबिक जबाबदाऱ्या, आरोग्याच्या समस्यांमुळे दवाखान्याच्या सततच्या फेऱ्या, घरची बिकट परिस्थिती आणि अनेक अडचणी अशा प्रतिकूल वातावरणात सौ. श्वेता यांनी हार मानली नाही. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपले शिक्षिका होण्याचे स्वप्न पूर्ण करायचेच, असा पक्का निर्धार त्यांनी मनाशी केला होता.
घरकाम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना मिळणाऱ्या प्रत्येक मिनिटाचा त्यांनी अभ्यासासाठी अत्यंत कौशल्याने सदुपयोग केला. अनेकदा आलेला थकवा आणि निराशेचे सावट बाजूला सारून त्यांनी आपला अभ्यास सातत्याने सुरू ठेवला. त्यांच्या याच प्रामाणिक प्रयत्नांना शेवटी यशाची सोनेरी किनार लाभली.
आपल्या या यशाचे श्रेय सौ. श्वेता यांनी सरकटे व खंडारे परिवारातील सर्व सदस्यांना, आई-वडील, आणि विशेषतः 'स्वरा' हिला दिले आहे. या संपूर्ण खडतर प्रवासात त्यांचे पती सुमित खंडारे यांनी दिलेली मोलाची साथ, विश्वास आणि केलेले अथक परिश्रम अत्यंत महत्त्वाचे ठरले.
सौ. श्वेता खंडारे यांचे हे यश परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या अनेक महिलांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरत आहे. 'जिद्द असेल तर परिस्थिती कधीच अडथळा बनू शकत नाही' हेच त्यांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवले आहे.
जिल्हा परिषद यवतमाळ येथे शिक्षिका म्हणून निवड झाल्याबद्दल आणि परिवाराची शिक्षकी परंपरा अशीच पुढे चालू ठेवल्याबद्दल सौ. श्वेता सुमित खंडारे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.
