बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. भाजप आमदार श्वेता महाले यांच्याशी सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर महिलांबद्दल विवादित विधान केल्याप्रकरणी आ. गायकवाड यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांच्या वाढदिवसा निमित्त बुलढाण्यात एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये ‘बाप तो बाप रहेगा’ हे गाणे वाजवले गेले. यानंतर भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये राजकीय वाकयुद्ध पेटले. ७ सप्टेंबर रोजी पत्रकारांशी बोलतांना आमदार संजय गायकवाड यांनी या रॅलीतील गाण्याचा संदर्भ देत आमदार श्वेता महाले यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. ‘बाप तो बाप रहेगा हे माणसानं बोललेलं बरं आहे, पण आता हे एखाद्या बाईनं म्हटलं, मी बाप आहे, तर बापासारखं शरीर कुठून आणणार?’ असे विधान त्यांनी केले होते. सामाजिक कार्यकर्त्या सविता भगवान बेंडवाल यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
