दुष्काळसदृश १८ जिल्ह्यांच्या यादीतून बुलढाण्याला डच्चू !* हेक्टरी १ लाखांची मदत देण्याची मागणी; अन्यथा सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडण्याचा रविकांत तुपकरांचा आक्रमक इशारा

दुष्काळसदृश १८ जिल्ह्यांच्या यादीतून बुलढाण्याला डच्चू !
* हेक्टरी १ लाखांची मदत देण्याची मागणी; अन्यथा सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडण्याचा रविकांत तुपकरांचा आक्रमक इशारा
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        राज्य सरकारने नुकतीच राज्यातील १८ दुष्काळसदृश जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीत बुलढाणा जिल्ह्याचा समावेश करण्यात न आल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या ४५ ते ५० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या पिकांची अक्षरशः होरपळ झाली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्याला दुष्काळसदृश यादीतून वगळणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया तुपकरांनी दिली. दुष्काळसदृश परिस्थितीचा निर्णय मंत्रालयातील एसी केबिनमध्ये बसून कागदावर घेतला जात असल्याचा आरोप करत तुपकरांनी सरकार आणि प्रशासनावर जोरदार निशाणा साधला. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली असती तर केवळ १८ नव्हे, तर महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळसदृश यादीत आले असते. शेतकऱ्यांना कमीत कमी मदत द्यावी लागावी म्हणूनच ही यादी तयार करण्यात आली आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


* सत्ताधारी लोकप्रतिनिधींना सुनावले खडे बोल!

        बुलढाणा जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे एक खासदार आणि सहा आमदार आहेत. या सर्व लोकप्रतिनिधींना लक्ष्य करत रविकांत तुपकरांनी थेट सवाल केला.लोकांनी तुम्हाला झोपा काढायला निवडून दिलं आहे का? गल्लीत आणि मतदार संघात राजकीय स्वार्थासाठी एकमेकांशी भांडत बसण्यापेक्षा मंत्रालयात जाऊन जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी भांडा. शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे, अशा शब्दांत तुपकरांनी सत्ताधारी लोकप्रतिनिधींना सुनावले.


* बुलढाण्याला कोरडा दुष्काळ जाहीर करा, अन्यथा...

         बुलढाणा जिल्ह्यातील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची मदत द्यावी आणि दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीत बुलढाण्याचा समावेश करावा, अशी मागणी रविकांत तुपकरांनी केली. बुलढाण्याला दुष्काळसदृश यादीत समाविष्ट करा आणि शेतकऱ्यांना न्याय द्या. जिल्ह्यातील सगळ्या लोकप्रतिनिधींनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी एकत्र यावं. अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही रस्त्यावर उतरू. सत्ताधाऱ्यांना आमच्या स्टाईलने जाब विचारू आणि सळो की पळो करून सोडू, असा आक्रमक इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे.