‘नाच रे मोरा’ बालनृत्य स्पर्धेचे आयोजन
* बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वृत्तेश्वर गणेशोत्सव मंडळाचा उपक्रम
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वृत्तेश्वर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘नाच रे मोरा’ बालनृत्य स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता १ ली ते ४ थी या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.
स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ७ हजार रुपये, द्वितीय ५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय दोन प्रोत्साहनपर बक्षिसे प्रत्येकी ५०० रुपये असून, प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेचा प्रवेश शुल्क २०० रुपये असून, स्पर्धकांना एकल (Solo) नृत्य सादर करावे लागणार आहे. प्रत्येक सहभागीला नृत्य सादरीकरणासाठी कमाल ३ मिनिटांचा वेळ देण्यात येईल. भारतीय, लोकनृत्य, शास्त्रीय, देशभक्तीपर, फिल्मी किंवा इतर कोणत्याही प्रकारचे नृत्य सादर करता येणार आहे.
स्पर्धकांनी संगीताची ऑडिओ/ट्रॅक आयोजकांकडे आगाऊ जमा करणे आवश्यक असून, वेशभूषा याबाबत विशेष लक्ष घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शाळेचा विद्यार्थी असल्याचे ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.
स्पर्धेचे ऑडिशन रविवार, २० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून बुलढाणा जिल्हा पत्रकार भवन येथे होणार आहे. इच्छुक पालकांनी आपल्या पाल्याचा सहभाग निश्चित करण्यासाठी आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले असून संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 7057029288, 8390795662, 9922359674, 9689227189 देण्यात आले आहेत.
