* भीषण दुष्काळ,पाठबळाची गरज - नगरसेवक सपकाळ
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने उघाड दिली आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असणाऱ्या सोयाबीनवर प्राकर्षाने झाला आहे. सोबतच खरीपातील उडीद मुंग यासह इतर पिके देखील हातची निघून गेली आहे, या दुष्काळाच भीषण वास्तव दर्शविण्यासाठी नगरसेवक सुनील सपकाळ यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आज जिल्हा प्रशासनास अर्ध नग्न होऊन अंगाला करपलेली सोयाबीन बांधत साष्टांग दंडवत घातला. शेतात वाळलेली भाराभर सोयाबीन आणून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवली. अवर्षणाने जिल्हा होरपळत आहे. शासनाने तात्काळ कोरड्या दुष्काळाची घोषणा करावी अशी मागणी सुनील सपकाळ यांनी यावेळी केली.
दुपारी बहुसंख्य शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया पुढे जमा होत दुष्काळ जाहीर करण्यासाठी तीव्र निदर्शने केली. यावेळी अर्ध नग्न आंदोलन करीत अंगाला सोयाबीनचे वाळलेली झाडे बांधून प्रशासनाचे लक्ष वेधले. प्रशासनाने शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करावा यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनास साष्टांग दंडवत घातला. दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, शेतकऱ्यांनी पेरणीपासून पिकांच्या संगोपनापर्यंत मोठा खर्च केला आहे. बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, मजुरी, डिझेल व कृषी निवेष्ठांच्या वाढलेल्या दरामुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीत पिकाची उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्च भरून निघने कठीण आहे. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकटाची छाया अधिक गडद होण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्याचा विचार केल्यास जिल्ह्याच्या बहुतेक तालुक्यात पाऊसच नाही. पावसाअभावी पिके वाळत आहे. सोयाबीनला कुठे दोन तर कुठे चार शेंगा आहे.तर काही ठिकाणी उभे झाड वाळून गेले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी कोरडा दुष्काळ घोषित करावा, पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करावा, शेतकऱ्यांना कर्ज वसुली देण्यासाठी पत पेढी स्थगिती व आवश्यकतेनुसार कर्ज पुनर्गठण करावे, शेतीसाठी आवश्यक वीजपुरवठा सुरळीत ठेवावा आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी नगरसेवक सुनील सपकाळ, पत्रकार गणेश निकम, पत्रकार संदीप वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते निलेश भुतडा, निलेश पाकारे, सुजित देशमुख, राम हिंगे, सुनील मोरे, निलेश राऊत, प्रशांत सपकाळ, नितीन कानडजे, मनोज उन्हाळे, श्रीकृष्ण गवते , गोपाल कालेकर, आदेश पाटील, धनराज ठेंग, पांडुरंग भारती , बनेश गायकवाड आदी शेतकरी उपस्थित होते.
* जिल्हाधिकाऱ्यांनी मोजल्या सोयाबीनच्या शेंगा
शेतकऱ्यांनी आणलेल्या सोयाबीनची झाडे हातात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी झाडाच्या शेंगा मोजून पाहात आपली संवेदनशीलता दाखविली. यावेळी काही झाडांना दोन तर वाळलेल्या झाडाला एकही शेंग आढळून आली नाही. दुष्काळाची भीषण वास्तवता शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कथन केली. तर आपले म्हणणे शासनाकडे पाठवणार असे जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे म्हणाले.
