आमदार गायकवाड, माजी आ. कायंदेनी उलगडला संघर्षपट !* 80's ट्रेंड : 'एआय' नाही.. 'आयएम'चा संदेश

आमदार गायकवाड, माजी आ. कायंदेनी उलगडला संघर्षपट !
* 80's ट्रेंड : 'एआय' नाही.. 'आयएम'चा संदेश    
बुलढाणा/ एशिया मंच टीम
        आजकाल एआयने सर्वांना भुरळ घातली आहे. सोशल मीडियावर नवनवीन ट्रेंड बघायला मिळताहेत. सध्या 80's ट्रेंडचे फॅड आले आहे. 80 च्या दशकातील फॅशननुसार आपले फोटो एआयकडून तयार केले जात आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंना चांगली पसंती मिळत आहे. मात्र, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि सिंदखेडराजाचे माजी आमदार तोताराम कायंदे यांनी आपले ओरिजनल फोटो पोस्ट करून AI नाही तर I am... असा संदेश देत स्व:कर्तृत्वावर विश्वास दाखवला आहे. 

          आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या बेधडक स्टाईलमध्ये फेसबुक पोस्ट केलीय. 80's लूक एआयमधून तयार करण्याची गरज नसल्याचे सांगत त्यांनी त्याकाळचे त्यांचे ओरिजनल फोटो पोस्ट केले आहेत. त्याखाली कॅप्शन लिहलंय "Original 1980’s… तेव्हाही शिवरायांचा मावळा, आजही शिवरायांचाच मावळा..! ही एआयची कल्पना नाही… हा संघर्षाच्या काळाचा ओरिजनल इतिहास आहे..! जुने फोटो… तोच रुबाब… तोच संघर्ष… आणि आजही तोच दम..! "

*गायकवाड- शिंदे एका फ्रेममध्ये : 
         विशेष म्हणजे आमदार गायकवाड यांनी पोस्ट केलेल्या एका फोटोत त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आ. विजयराज शिंदे दिसत आहेत. त्याकाळी त्यांच्यात गहरी दोस्ती होती. कालांतराने त्यांच्या मैत्रीत कटुता आल्याने 'जानी दोस्त' हे 'जानी दुश्मन' बनले. मात्र 80's ट्रेंडने त्यांना पुन्हा एकदा जवळ आणले आहे, असे आपण म्हणूया. बाकी त्यांचं त्यांना माहीत. तसंही संजुभाऊ अलीकडे शिंदेबद्दल सॉफ्ट कॉर्नन ठेवून वागताना दिसत आहेत. राजकारणात काहीही होऊ शकते... 

* कायंदेनी जागवल्या संघर्षाच्या आठवणी : 
       मातृतीर्थ सिंदखेडराजाचे माजी आमदार तोताराम कायंदे यांनीही फेसबुकवर आपला जुना फोटो पोस्ट केला आहे. "१९८०चं दशक… संघर्षाचं, साधेपणाचं आणि आपल्या व्यक्तिमत्त्वातून ओळख निर्माण करण्याचं दशक..." अशा ओळी त्यांनी लिहल्या आहेत. स्वतःच्या हिंमतीवर, संघर्षातून विश्व निर्माण केल्याचे सांगत कायंदेनी संघर्ष काळातील आठवणी जागवल्या आहे.