प्रतीक्षा संपली; बुलढाण्यात पावसाला सुरुवात* सरींनी वातावरणात गारवा, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

प्रतीक्षा संपली; बुलढाण्यात पावसाला सुरुवात
* सरींनी वातावरणात गारवा, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       गेल्या महिनाभरापासून रुसून बसलेल्या पावसाने आज अखेर हजेरी लावली. दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास बुलढाण्यात पावसाला सुरुवात झाली. पावसाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

       आगस्ट मध्यापासून पावसाने उघडीप दिली. त्यामुळे पिकांनी माना टाकायला सुरुवात केली होती. प्रमुख पीक सोयाबीन, कपाशी धोक्यात सापडले होते. खरीप हातचा जाणार, अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली होती. कधी एकदा पाऊस पडतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. पिकांची अवस्था पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले होते. पावसाअभावी जिल्हयात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवण्याबाबत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी शासनाकडे मागणी केली होती. सर्वच राजकीय पुढारी शासनाकडे दुष्काळ जाहीर करण्याबाबत मागणी करीत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 11 सप्टेंबरपासून पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आशा होत्या. अखेर पावसाने हजेरी लावली अन सर्वांनाच दिलासा मिळाला. आता परतलेल्या पावसाने जोरदार बॅटिंग करावी, म्हणजे सर्व कुशलमंगल होईल.....