* पत्रतपस्वी ग्रंथ ग्रामीण पत्रकारितेच्या वाटेवरचा मैलाचा दगड - डॉ. निलेश गावंडे
* विदर्भ न्याय परिवाराच्या रोमारोमात उपक्रमशिलता भिनलेली - सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
बाप ज्या वाटेवरचा वाटसरू असतो त्याच वाटेवरचा वाटसरू मुलगा होईल याची कधी शाश्वती नसते. बापाने डेरेदार केलेल्या अनेक परंपरा मुलांमुळे सैरभैर झाल्याची मोजदादीपलीकडची उदाहरणे समाजात आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्व. भोजराज गाडेकर यांनी ग्रामीण पत्रकारितेला स्वतःला वाहून घेतले. विदर्भ न्यायच्या माध्यमातून ग्रामीण पत्रकारितेच्या वटवृक्षाचे भक्तीने, निष्ठेने संवर्धन, संगोपन केले. पत्रतपस्वी ग्रंथप्रकाशनाच्या माध्यमातून वडिलांनी सोपवलेली वस्तुनिष्ठ पत्रकारितेची ध्येयासक्त परंपरा पुढे नेण्याचे सश्रद्ध द्योतक आहे. पत्रकार वडिलांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त पाच पत्रकारांना उत्कृष्ट कार्यगौरव पत्रकारिता पुरस्कार देऊन विदर्भ न्यायने भोजराज गाडेकर यांच्या मनातील नेमकी श्रद्धांजली अर्पित केली आहे. मुलांच्या या श्रद्धांजलीमुळे वैकुंठात आज स्व. भोजराज गाडेकर यांचा आत्मा हर्षला असेल, सुखावला असेल असे मनस्वी भावनिक प्रतिपादन प्रख्यात मराठी कवी, नामवंत वक्ते, निवेदक अजीम नवाज राही यांनी काढले.
शनिवार 12 सप्टेंबर 2026 रोजी ते पत्रतपस्वी स्व. भोजराज नरहरी गाडेकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त पलसिध्द महास्वामी मठाच्या सभागृहात आयोजित पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तथा भव्यदिव्य पत्रतपस्वी ग्रंथप्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणेदार युवराज रबडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मठाधिपती सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज, प्राचार्य डॉ. निलेश गावंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीपराव बेंडमाळी, माजी पंचायत समिती उपसभापती सुनील जगताप, सरपंचपती अमित जाधव, अॅड. अश्विनी सावजी, अॅड. निशिकांतराजे जाधव, जगदेव मराठे, शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक नागरे, नंदकिशोर शिंगणे, लोकजागरचे प्रविण गीते, मॅथ्स कोचिंग क्लासेसचे संचालक शिवशंकर डुकरे पाटील,प्रा दिलीप नाईकवाड, सवडदचे सरपंच गजानन देशमुख, दामोदर लांभाडे, आबासाहेब मोरे, भास्कर इंगळे, मो. पठाण, पंढरी शेळके, गोपाल मानतकर, दिलीपराव खंडारे, सूतगिरणीचे कार्यकारी संचालक बबनराव लोढे, सैय्यद रफीक, आयुबसेठ कुरेशी, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रावसाहेब देशपांडे, यशराज ग्राफीक्सचे डिझायनर नारायण भोलवणकर, ग्रामपंचायत सदस्य संदीप खिल्लारे, माजी सरपंच दाऊत कुरेशी, रमेश ठोसरे, मुख्याध्यापक विष्णू ठोसरे,पत्रकार डि. एन. पंचाळ, अशोक इंगळे, सचिन खंडारे, गजानन सरकटे, रवी वाघ, मनोज जाधव, संजय आंभोरे, रमेश जैवाळ, प्रभाकर धुळे, हे उपस्थित होते.
प्रारंभी श्रीमज्जगद्गुरु पलसिध्द महास्वामी, पत्रतपस्वी स्व भोजराज नरहरी गाडेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून समईप्रज्वलन करण्यात आले.
पत्रतपस्वी ग्रंथाच्या डिजीटल कव्हरपेजचे रेबीन कापून विमोचन करण्यात आले. दरम्यान दिपक आखरे, ज्ञानेश्वर राहाटे यांच्या स्वागत गीतांच्या स्वरलहरींनी मान्यवरांवर स्वागतफुलांचा वर्षाव केला. प्रारंभापासून समारोपापर्यंत या भावनिक कार्यक्रमाच्या ओलाव्याने उपस्थितांच्या अंतःकरणाची पकड घेतली.
दरम्यान पाच पत्रकारांना मानचिन्ह, स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तद्नंतर दहावी, बारावीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. राजुरेश्वर ज्वेलर्सच्या वतीने ह्या विद्यार्थ्यांना वृक्षभेट देऊन पर्यावरणाचा संदेश देण्यात आला.
आपल्या ओघवत्या भाषणात अजीम नवाज राही पुढे म्हणाले की, माणसाला सत्तेचा, मालमत्तेचा, संपत्तीचा हेवा असतो भोजराजभाऊंची भक्ती शब्दांवर होती. शब्दांच्या प्रेमाखातर त्यांनी अख्खं आयुष्य ग्रामीण पत्रकारितेला समर्पित केलं. वर्तमानयुग हे डिजिटल युग आहे. सुविधांची गडगंज आयुधे माणसाच्या पायाशी लोळण घेत आहेत. परंतू भोजराजभाऊंनी ग्रामीण भागातून ज्या काळात विदर्भ न्यायच्या माध्यमातून ग्रामीण पत्रकारितेची वाटचाल सुरू केली तो काळ आव्हानांचा, समस्यांचा होता. कठीण कातळाला भेदून पिंपळवृक्ष ज्या पध्दतीने फोफावतो आव्हानांना न भिता त्यांना तोंडघशी पाडण्याचा जिगरबाज स्वभाव भोजराजभाऊंचा होता. जेमतेम शिक्षणाच्या बळावर त्यांचा हात शेवटच्या श्वासापर्यंत लिहता राहिला. शिक्षणाचा प्रतिभेशी सूतराम सबंध नसतो हे भोजराजभाऊ यांच्या लेखणीच्या सातत्याने सिध्द केलं. त्यांचे प्राण ग्रामीण पत्रकारितेमध्ये गुंतले होते. आपल्या मुलांची जडणघडण करताना त्यांनी स्थावर आर्थिक सक्षमता बहाल केली नाही पण शब्दांचा वसा-वारसा त्यांच्या सुपूर्द केला. त्यांच्यातल्या निष्ठेचा भक्तीचा, सचोटीचा परिणाम म्हणून त्यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त वडिलांच्या वृत्तप्रवासाच्या आठवणी पुस्तक रूपातून समाजासमोर मांडल्या. बोअरला पाणी लागणे आणि संतती चांगली निघणे प्रत्येकाच्या नशिबी नसते. भोजराजभाऊ पुण्यवान आहेत कि त्यांच्या परिवाराने या सोहळ्याला चिरस्मरणीय केले आहे.
सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज
पाखरं आकाशाच्या दिशेने भरारी घेतात. घरटं एकाकी पडतं पक्षी-पक्षीणी पाखरं परत येण्याची वाट पाहतात. घरटं सोडून गेलेली पाखरं इंद्रधनुष्यी आकाशातल्या भौतिक सुखसमृद्धीच्या इंद्रधनुष्याच्या रंगात रमतात.नंतर घरट्याकडे परतणे विसरतात. अशा भ्रमित काळात बापाच्या आवडी- निवडीचा छंदाचा समर्पित भाववृत्तीचा वसा वारसा समर्थपणे खांद्यावर पेलण्याची जबाबदारी स्वीकारणारी मुले समाजात अपवादानेच आढळटात. पत्रतपस्वी ग्रंथासाठी संतोष गाडेकरांनी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे.भोजराज गाडेकर यांच्या सहवासातील लोकांना लिहतं केलं. ते क्षण सजीव करून स्मृतीग्रंथाची पाने बोलकी केली.
यावेळी डॉ. निलेश गावंडे बोलतांना म्हणाले की, वडिलांच्या उपक्रमशीलतेचे बिजारोपन करून संतोष गाडेकर यांनी विदर्भ न्याय पर्यंत मर्यादित न राहता दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमांची आखणी करताना समाजामध्ये आपल्या आयोजनाचा उपक्रमशिलतेच्या माध्यमातून समाजाला आपले काहीतरी देणं लागतं याचं सजग भान ठेवत विदर्भ न्यायच्या माध्यमातून उपक्रमशीलतेची दणकट साक्ष आहे. पदरमोडीतून असे खर्चिक कार्यक्रम आयोजित करणे सोपे नसते. वडिलांची पुण्यतिथी घरीही साजरी करता आली असती पण वडिलांच्या पुण्यतिथीला सामाजिक कृतज्ञतेची किनार बहाल करून वस्तुनिष्ठ पत्रकारितेला अर्पित करत प्रेरणा मिळण्यासाठी पत्रकारांना, विद्यार्थ्यांना सन्मानित केले. वडिलांच्या ऋणातून कोणीही उतराई होऊ शकत नाही पत्रकार बापाच्या पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक जाणिवेतून अशा भावनिक सोहळ्याचे आयोजन करुन मला या स्वागतसमारंभाचे अध्यक्ष केले हे माझे अहोभाग्य आहे असे ते म्हणाले.
* या पत्रकारांचा झाला सन्मान :
यावेळी सुषमा राऊत देऊळगावराजा, राजेश तोटे खामगाव, मधुकर मोहिते बिबि, सुखनंदन इंगळे बुलडाणा, राजेश दवणे यवतमाळ यांना पत्रतपस्वी स्व. भोजराज नरहरी गाडेकर उत्कृष्ट कार्यगौरव पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
* पुनम वायसेंनी केली चित्तथरारक प्रात्यक्षिके :
दुधा येथील शिवकालीन युगंधर मैदानी खेळात पारंगत कु. पुनम वायसेंनी विविध चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कु. मयुरी गजानन झोरे यांनी तर आभार प्रदर्शन मो. असलम अंजूम यांनी केले. यावेळी ठाणेदार युवराज रबडे, सोहम जीवन गाडेकर यांची समयोचित भाषणे झाली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी तेजरावबापू देशमुख, सागर मगर,सोमेश्वर इंगळे, अरूण देशमुख, अविनाश राऊत, गोलू सुर्यवंशी, ज्ञानेश्वर राऊत, संजय देशमुख, दीपक गवळी, विलास आंभोरे, संजय गाडगे, शिवाजी लहाने यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी उर्दू हायस्कूलवर शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल अक्षय गणेश डोईफोडे यांचा सत्कार करण्यात आला.
