भडगाव शिवारातील लता कोतकर हत्या प्रकरण* पुराव्यांअभावी आरोपी बाळू बारहातेची निर्दोष मुक्तता

भडगाव शिवारातील लता कोतकर हत्या प्रकरण
* पुराव्यांअभावी आरोपी बाळू बारहातेची निर्दोष मुक्तता

बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
          भडगाव शिवारातील जंगल परिसरात कुऱ्हाड आणि दगडाने ठेचून करण्यात आलेल्या लता मुरलीधर कोतकर यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात आरोपी बाळू उर्फ बाळासाहेब मुंजाजी बारहाते (वय ३३ रा. सैलानी ) याची बुलढाणा सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
       प्राप्त माहितीनुसार, मृत लता कोतकर (रा. सुलतानपूर, जि. औरंगाबाद) या गेल्या १० वर्षांपासून पायाच्या त्रासामुळे दर्शनासाठी सैलानी येथे येत-जात होत्या व रामधन पासराते यांच्याकडे घरकाम करत राहत होत्या. १३ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी त्या बेपत्ता झाल्या. १४ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी भडगाव शिवारातील जंगलात त्यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आणि तोंडावर व डोक्यावर गंभीर दुखापत झालेला मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख त्यांची मुलगी सपना खिल्लारे हिने पटवली.                 याप्रकरणी रायपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा (भादंवि कलम ३०२) गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासा दरम्यान पोलिसांनी पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत १७ डिसेंबर २०२२ रोजी बाळू बारहाते याला अटक केली. आरोपीने मृत लता यांना जंगलात नेऊन कुऱ्हाड व दगडाने ठेचून मारल्याचा आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न (भादंवि कलम २०१) केल्याचा आरोप ठेवत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
    साक्षीदारांच्या जबानीत मोठ्या प्रमाणात विसंगती आढळून आली. दुकानातून जप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेजची व्हिडिओ क्लिप अस्पष्ट असल्याने त्यातून आरोपी किंवा मयत व्यक्तीची ओळख पटू शकत नाही, असा सीए अहवाल आला होता.
सीसीटीव्ही फुटेज पुरावा म्हणून सादर करताना भारतीय पुरावा कायद्याच्या कलम ६५-बी अंतर्गत आवश्यक असणारे प्रमाणपत्र योग्य पद्धतीने व योग्य व्यक्तीकडून सादर करण्यात आले नाही.
        गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड जप्त केली असली तरी रासायनिक विश्लेषण अहवालाल त्यावर मानवी रक्ताचे डाग आढळून आले नाहीत. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते मृतदेहावर कुऱ्हाडीने केलेल्या जखमा नव्हत्या. मुद्देमाल रासायनिक प्रयोगशाळेत पाठवताना योग्य प्रकारे सीलबंद नव्हता व पुन्हा पोलीस ठाण्यात सील उघडले गेले होते. त्यामुळे पुराव्याशी छेडछाड झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण:
न्यायालयाने नमूद केले की, ही संपूर्ण केस परिस्थितिजन्य पुराव्यांवर आधारित होती. सर्वोच्च न्यायालयाच्या विविध दाखल्यांचा संदर्भ देत न्यायालयाने स्पष्ट केले की, केवळ संशयाच्या आधारे कुणालाही दोषी ठरवता येत नाही आणि संशय हा पुराव्याची जागा घेऊ शकत नाही. तपासातील त्रुटींमुळे पुराव्याची साखळी जोडता आली नाही, त्यामुळे संशयाचा फायदा आरोपीला मिळणे कायद्यानुसार आवश्यक आहे.
त्यामुळे न्यायालयाने आरोपी बाळू बारहाते याला सर्व आरोपातून निर्दोष मुक्त करत तात्काळ कारागृहातून सोडण्याचे आदेश दिले. अ‍ॅड. पी. आर. सानप यांचा महत्वपूर्ण युक्तिवादातून खून प्रकरणातील आरोपीची सुटका झाली आहे.