रेणुकामाता सहकारी पतसंस्थेच्या नुतन वास्तुत स्थलांतर सोहळा * गावाला स्वर्ग करण्याची ताकद सहकारात - राध्येशामजी चांडक

रेणुकामाता सहकारी पतसंस्थेच्या नुतन वास्तुत स्थलांतर सोहळा 
* गावाला स्वर्ग करण्याची ताकद सहकारात - राध्येशामजी चांडक
चिखली : (एशिया मंच न्यूज )
          मागील काही वर्षात राज्याती़ल अनेक सहकारी पतसंस्था बंद पडल्या परंतू यामध्ये बुलडाणा जिल्ह्याचे नांव आले नाही. कारण बुलडाणा जिल्ह्यातील पतसंस्था ह्या शिस्तीमध्ये चालत आहे. आपला पैसा सुरक्षित राहावा म्हणून मोठ्या विश्वासाने आज प्रत्येकजण पतसंस्थांमध्ये ठेवी ठेवत आहेत. त्यांच्या विश्वासाला बुलडाणा जिल्ह्यातील पतसंस्थांनी तडा जावू दिला नाही. सहकार म्हणजे विश्वास. ही भावना वाढीस लागत आहे. ही अभिमानाची बाब म्हणावी लागेल. येणारा कालावधी हा पतसंस्थांसाठी चांगला असून पतसंस्थेच्या अध्यक्ष व संचालकांनी आपल्या आचरणातून ठेवीदारांचा व सभासदांचा विश्वास संपादन करावा, तसेच गावाला स्वर्ग करण्याची ताकद सहकारात आहे,असे प्रतिपादन बुलडाणा अर्बन परिवाचे संस्थापक अध्यक्ष राध्येशाम चांडक उपाख्य भाईजी यांनी केले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
          चिखली शहराच्या सहकार क्षेत्रात गेल्या 33 वर्षापासून विश्वासार्ह आणि यशस्वी वाटचाल करणार्‍या रेणुकामाता नागरी सहकारी पतसंस्थेच्या नुतन वास्तुत स्थालांतरण सोहळा आज रविवार दि.13 सप्टेबर रोजी चिखली मतदार संघाच्या आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये नगराध्यक्ष पंडीतदादा देशमुख, उपनगराध्यक्षा वैशालीताई खेडेकर, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर, चिखली अर्बनचे माजी अध्यक्ष सतिश गुप्त, शि.प्र.म.चे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, अंबिका अर्बनचे अध्यक्ष अ‍ॅड.विजयकुमार कोठारी, रेणुकामाता पतसंस्थेचे मार्गदर्शक प्रेमराजजी भाला, दुय्यम निबंधक राजेंद्र घोंगे, रेणुकामाता पतसंस्थेच्या अध्यक्ष ज्योतीताई भाला, नगरसेविका डॉ.मिनलताई गावंडे हे मंचावर उपस्थित होते.
         ते पुढे म्हणाले की, पतसंस्थांनी आपली प्रगती साधतांना गोडाऊन योजना, शितगृह योजना राबवाव्यात. तसेच पतसंस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रातील काही गावातील ग्रामसेवा सोसायट्या दत्तक घेऊन त्यातून विकासाच्या नव नविन योजना राबवून खेडी स्वयंपूर्ण करण्याचे जे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा गृहमंत्री अमित शहा यांनी बघीतले आहे ते पूर्ण करण्यास हातभार लावावा. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी आ.सौ.श्वेताताताई महाले, विद्याधर महाले, प्रा.नरेंद्र खेडेकर यांची समयोचित भाषणे झालीत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेणुकामाता पतसंस्थेचे संचालक राजेश कोठारी यांनी केले. तर आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक माजी नगरसेवक निलेश अंजनकर यांनी केले. यावेळी संस्थेचे सर्व संचालक मंडळ, सभासद, भागधारक, ठेवीदार यांच्यासह परिसरातील मान्यवर मंडळींची उपस्थिती होती.
      
* बुके ऐवजी बुक देवून सत्कार : 
       वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून सत्काराच्यावेळी नेहमीप्रमाणे पानाफुलांचा बुके न देता बुक (पुस्तक) देवून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला हे विशेष.

* सत्काराच्या माध्यमातून उतराई होण्याचा प्रयत्न : 
        रेणुकामाता पतसंस्थेच्या नविन वास्तुत स्थालांतर सोहळ्याच्या निमित्ताने पतसंस्थेकडून अपंग विद्यार्थी, शहीद जवानाच्या वीरपत्नी, तसेच देशसेवेसाठी सैन्यदलात आपली अपत्ये पाठविणार्‍या मातेचा व तिच्या पुत्राचा यावेळी सत्कार करण्यात आला. शिवाय शहरातील तीनही हिंदु स्मशानभूमिचे सुशोभिकरण करणार्‍या पतसंस्थांच्या अध्यक्षांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यात जुनागांव स्मशानभूमिसाठी श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष पंडीतदादा देशमुख, हिंदु स्मशानभूमिसाठी धनश्री अर्बनचे अध्यक्ष अजय कोठारी, तर राऊतवाडी स्मशानभूमिसाठी प्रा.निलेश गावंडे यांचा सत्कार करण्यात आला.