स्वच्छतेचा वसा, ग्रामस्थांच सामाजिक कार्य भावले* जिल्हाधिकाऱ्यांनाही वाटले देऊळगाव माळीकरांच्या उपक्रमाचे कौतुक...

स्वच्छतेचा वसा, ग्रामस्थांच सामाजिक कार्य भावले
* जिल्हाधिकाऱ्यांनाही वाटले देऊळगाव माळीकरांच्या उपक्रमाचे कौतुक...
देऊळगाव माळी : (एशिया मंच न्यूज )
     देऊळगाव माळीतील जागरूक ग्रामस्थांनी एका ठिकाणी येत गावासाठी स्वच्छतेचा वसा घेतला आहे. या अनोख्या उपक्रमाचे जिल्हाधिकारी डॉ.प्रवीणकुमार देवरे यांच्याकडून विशेष कौतुक करण्यात आले. त्यांचा साधेपणा पहा. हा उपक्रम मला बघायला आवडेल असे म्हणत त्यांनी कौतुक तर केलेच मात्र गावाकडे येण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यांच्या भूमिकेने ग्रामस्थांना हत्तीचे बळ मिळाले आहे. 

    सरकारच्या तिजोरीतून निधीची ‘टोकन’ तरतूद होणार, त्याचे निविदांचे गुऱ्हाळ चालणार आणि मग कधीतरी शासकीय लालफितीतून एखादी मूलभूत सुविधा आकाराला येणार, ग्रामीण भागातील विकासाची ही पारंपरिक आणि आळशी चौकट बुलढाण्यातील ‘देऊळगाव माळी’ या गावाने मोडून काढली आहे. प्रत्येक गोष्टीसाठी शासनाकडे हात पसरण्याची वृत्ती बाजूला सारत, गावातील 'सेवानिवृत्तांचा सेवा संघा'ने पुढाकार घेतला आणि ग्रामस्थांच्या भक्कम लोकसहभागातून 'ओंकारेश्वर मोक्षधाम स्मशानभूमी'चा असा कायापालट केला की, आज संपूर्ण जिल्ह्यासाठी हे गाव कौतुकाचा आणि आदर्शाचा विषय ठरले आहे.
      अंतिम प्रवासाच्या ठिकाणी असलेली दुरवस्था दूर करत, तेथे स्मशानभूमी ऐवजी 'सुसज्ज व प्रसन्न मोक्षधाम' उभारण्याचा ध्यास या निवृत्त कर्मचाऱ्यांनी घेतला. गावकऱ्यांनीही या आवाहनाला प्रतिसाद देत सढळ हस्ते आर्थिक मदत दिली. या लोकवर्गणीतून आज मोक्षधामात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र टिन शेड, दिवंगत व्यक्तीच्या परिवारासाठी स्वतंत्र टिन शेड, दुःखाच्या प्रसंगात नातेवाईकांना बसण्यासाठी आसने, झाडांभोवती ओटे, आणि सुसज्ज प्रसाधनगृह उभे राहत आहे. लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या या कामाची दखल नुकतीच जिल्हा प्रशासनानेही घेतली.

* जिल्हाधिकारी यांच्याकडून कौतुकाची थाप : 
       २२ सप्टेंबर रोजी सेवा संघाच्या शिष्टमंडळाने बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ.प्रवीणकुमार देवरे यांची भेट घेऊन कामाचा संपूर्ण लेखाजोखा व छायाचित्रे सादर केली. हे काम पाहून जिल्हाधिकारी डॉ.प्रवीणकुमार देवरे यांनी सेवा संघाचे भरभरून कौतुक केले."हा उपक्रम केवळ एका गावापुरता मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्याला दिशा देणारा आहे. जिल्ह्यातील इतर गावांमधील सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी यांनी असा आदर्श घेतला, तर ग्रामीण भागाचे चित्र बदलायला वेळ लागणार नाही. मी स्वतः या मोक्षधामाला भेट देईन, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ .सुकेश झंवर यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत, हा उपक्रम इतर गावांसाठी प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट केले. या प्रसंगी सेवानिवृत्तांच्या सेवासंघाचे अध्यक्ष दिगंबर अंभोरे, नारायण बळी (सचिव), शिवाजी जमधाडे (कोषाध्यक्ष), पत्रकार कैलास राऊत (प्रसिद्धीप्रमुख) उपस्थित होते.

 
 * सत्कार सोहळा अन् राहिलेल्या कामांसाठी आवाहन : 

       पुढील एक दोन महिन्यात सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर ओंकारेश्वर मोक्षधामात एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करून सर्व दानदात्यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. दरम्यान, स्मशानभूमी परिपूर्ण करण्यासाठी अजूनही काही कामे प्रस्तावित आहेत.
महिला कक्षात काँक्रिटीकरण व अतिरिक्त दहन शेड संरक्षक भिंत (कंपाउंड वॉल) व त्यावर संतांच्या सुवचनांचे लेखन
श्रद्धांजली कक्ष, ध्वनिक्षेपकाची (साऊंड सिस्टीम) सोय आणि वृक्षारोपण या उर्वरित कामांसाठी आणखी निधीची गरज असून, ज्या ग्रामस्थांनी किंवा दानदात्यांनी अद्याप योगदान दिलेले नाही, त्यांनी या पवित्र कार्यात आपला वाटा उचलावा, असे आवाहन सेवानिवृत्तांच्या सेवासंघाचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर सखाराम अंभोरे यांनी केले आहे.