बुलढाणा–पोहरादेवी सरळ बससेवेच्या मागणीला यश* भाविकांचा प्रवास होणार सुलभ; डोंगर खंडाळ्यात बसचे उत्स्फूर्त स्वागत

बुलढाणा–पोहरादेवी सरळ बससेवेच्या मागणीला यश
* भाविकांचा प्रवास होणार सुलभ; डोंगर खंडाळ्यात बसचे उत्स्फूर्त स्वागत
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        बुलढाणा ते पोहरादेवी सरळ बससेवा सुरू करण्याच्या मागणीला अखेर यश आले. या पहिल्या बससेवेचा शुभारंभ बुलढाणा आगार स्थानक परिसरात आमदार संजय गायकवाड, आगार प्रमुख पवार, मांगीलाल महाराज, साहेबराव चव्हाण, एकनाथ चव्हाण, विठ्ठल चव्हाण यांच्यासह बंजारा समाजातील नागरिकांच्या उपस्थितीत नारळ फोडून करण्यात आला.

         बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे दर्शनासाठी बुलढाणा जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक जातात. मात्र, थेट बससेवा उपलब्ध नसल्याने भाविकांना प्रवासादरम्यान दोन-तीन ठिकाणी बस बदलावी लागत होती. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच कुटुंबासह प्रवास करणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता बुलढाणा ते पोहरादेवी थेट बससेवा सुरू झाल्याने या प्रवासातील अडथळा दूर झाला आहे.

          या बससेवेमुळे जिल्ह्यातील नागरिक व भाविकांना पोहरादेवीपर्यंत थेट प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली असून, वेळ व श्रमाची बचत होणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला प्रत्यक्ष बससेवेच्या रूपाने मूर्त स्वरूप मिळाल्याने बंजारा समाजातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

       दरम्यान, डोंगर खंडाळा गावातील तांडा वस्तीच्या वतीने बुलढाणा–पोहरादेवी बसचे हार घालून व नारळ फोडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी तुकाराम चव्हाण, तातूबा राठोड, शेषराव चव्हाण, सोपान चव्हाण, रामेश्वर चव्हाण यांच्यासह डोंगर खंडाळा गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते.

      दीर्घकाळापासून करण्यात येत असलेल्या मागणीला यश मिळाल्याने गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पोहरादेवीच्या दर्शनासाठी आता भाविकांना दोन-तीन ठिकाणी बस बदलण्याची कसरत करावी लागणार नसून, बुलढाण्यातून थेट पोहरादेवी पर्यंतचा प्रवास करता येणार आहे. त्यामुळे ही बससेवा बंजारा समाजासह जिल्ह्यातील हजारो भाविकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.