दुष्काळ सदृश्य जिल्ह्यांच्या यादीत बुलढाणा जिल्ह्याचा समावेश करावा * मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची मागणी

दुष्काळ सदृश्य जिल्ह्यांच्या यादीत बुलढाणा जिल्ह्याचा समावेश करावा  * मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची मागणी 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या बुलडाणा जिल्ह्याचा 18 दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीत तातडीने समावेश करून शेतकऱ्यांना आवश्यक मदत द्यावी, अशी मागणी केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी राज्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

        राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्यामुळे खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनामार्फत 18 दुष्काळसदृश जिल्ह्यांचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र, सदर यादीमध्ये बुलडाणा जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नाही. बुलडाणा जिल्ह्यातील सद्यस्थितीचा विचार करता ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.
     बुलडाणा जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यांसह विविध खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. पिकांच्या वाढीच्या व उत्पादनाच्या महत्त्वपूर्ण कालावधीत पुरेसा पाऊस न झाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

      विशेषतः भारतीय हवामान विभागाच्या साप्ताहिक पर्जन्यमान अहवालानुसार 2 सप्टेंबर 2026 रोजी संपलेल्या आठवड्यात बुलडाणा जिल्ह्यातील पर्जन्यमान सामान्यापेक्षा सुमारे 87 टक्के कमी नोंदविण्यात आली आहे. तसेच, 2 ते 3 सप्टेंबर 2026 दरम्यानच्या 24 तासांत बुलडाणा येथे पावसाची नोंद झाली नसल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन 5 सप्टेंबर 2026 रोजी बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील आवश्यक भागात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्याबाबत आपणांस ई-मेलद्वारे पत्र पाठवून मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही बुलडाणा जिल्ह्यातील पर्जन्यस्थिती आणि खरीप पिकांवरील संकट कायम आहे.
सध्या शासनाने ज्या जिल्ह्यांचा दुष्काळसदृश परिस्थितीच्या निकषांवर विचार केला आहे, त्याच निकषांच्या आधारे बुलडाणा जिल्ह्याचाही तातडीने फेरआढावा घेणे आवश्यक आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आदी जिल्ह्यांप्रमाणेच बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी देखील पावसाच्या खंडामुळे चितांतुर झाला आ्हे . शासान म्हणून या शेतकऱ्यांना मदत गरजेचे आहे .त्यामुळे माझी आपणांस विनंती आहे की 
बुलडाणा जिल्ह्याचा 18 दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीत तातडीने समावेश करण्यात यावा.
    जिल्ह्यातील खरीप पिकांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान सर्वेक्षण व पंचनामे करण्यात यावेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार तातडीची आर्थिक मदत व पीकनुकसान भरपाई देण्यात यावी.
दिनांक 5 सप्टेंबर 2026 रोजी करण्यात आलेल्या कृत्रिम पावसाच्या मागणीचा सकारात्मक विचार करून, हवामान परिस्थिती अनुकूल असल्यास आवश्यक त्या भागात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्याबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा.

     बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहेत. शासनाच्या मदतीपासून जिल्ह्यातील एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी बुलडाणा जिल्ह्याचा दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीत तातडीने समावेश करून आवश्यक आर्थिक व प्रशासकीय मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना द्यावेत अशी विनंती केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलडाणा जिल्हयाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणविस यांचाकडे केली आहे.