* लुकमान शाह यांच्या नेतृत्वात मोताळा फाटा येथे रस्ता रोको आंदोलन
मोताळा : (एशिया मंच न्यूज )
सामाजिक कार्यकर्ते लुकमान शाह यांच्या नेतृत्वात आज 29 जुलै रोजी 'मोताळा फाटा' येथे भव्य व आक्रमक 'रस्ता रोको' आंदोलन छेडण्यात आले. या प्रसंगी भीमराव इंगळे, सरदार शाह, हनीफ खान, जितू खराटे, निंबाजी गायकवाड, साबीर शेख, मुंशीर खान, नसीम खान, असलम खान, सलीम शाह, फारुक शाह, उस्मान शा, साजिद खान,प्रामुख्याने उपस्थित होते.
मोताळा तालुका भौगोलिकदृष्ट्या व वाहतुकीच्या दृष्टीने बुलढाणा शहराशी अत्यंत जवळ असून सर्व प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना बुलढाणा हेच सोयीचे असताना मोताळा तालुका अपर जिल्हाधिकारी कार्यालय, खामगाव येथे जोडण्याचा तुघलकी निर्णय शासन-प्रशासनाकडून होत असल्याच्या चर्चेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
या अन्यायकारक निर्णयाविरोधात आणि तालुका पूर्ववत अपर जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्याशीच संलग्न ठेवण्याच्या ठाम मागणीसाठी आज २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नागरिकांनी रस्त्यावर उतरून एल्गार पुकारला. तालुका खामगावशी जोडल्यास सामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि विद्यार्थ्यांची नाहक ससेहोलपट होईल, आर्थिक फटका बसेल आणि वेळेचा मोठा अपव्यय होईल, असा इशारा आंदोलकांनी दिला. प्रशासनाने ही जनभावना लक्षात घेऊन मोताळा तालुका बुलढाण्याशीच ठेवावा, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा लुकमान शाह व सहकाऱ्यांनी दिला.
आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आंदोलकांनी अत्यंत शिस्तबद्ध व शांततेच्या मार्गाने आपले गांभीर्य प्रशासनासमोर मांडले. या आंदोलनात तालुक्यातील नागरिक, शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
