तब्बल 30 वर्षांनंतर झाली माय-लेकराची भेट* 'एसआयआर' चे काम करणाऱ्या बीएलओने घडवून आणली किमया

तब्बल 30 वर्षांनंतर झाली माय-लेकराची भेट
* 'एसआयआर' चे काम करणाऱ्या बीएलओने घडवून आणली किमया
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
      रागात घर सोडून गेलेल्या मुलाचा शोध घेऊन कुटुंबियांचे डोळे थकले. अखेर आता तो कधीच परतणार नाही, अशी मनाची समजूत घालून प्रपंचात गुंतले. मात्र नशिबाला त्यांना एकत्र आणायचे होते. मतदार यादी पुनरीक्षण करणाऱ्या बीएलओमुळे तब्बल ३० वर्षांनी मायलेकाची भेट झाली. या भावनिक प्रसंगाने उपस्थितांचे डोळे पाणावले. सिनेमात शोभावे असे हे कथानक मलकापूर येथे घडले. 

         सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केडगावचे रहिवासी नवनाथ धोंडीबा गायकवाड घरगुती वादातून अचानक घर सोडून निघून गेले होते. मुलगा कुठं गेला.? कसा असेल.? जिवंत तरी असेल का.? या विचाराने आई-वडिलांचे डोळे सुकले.. काळ लोटत गेला.. तब्बल तीन दशकं उलटली.. दुसरीकडे नवनाथ गायकवाड हे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे पोहोचले.. तिथे त्यांनी काँग्रेस नेते रशीदखा जमादार यांच्याकडे काम करण्यास सुरुवात केली आणि नंतर गांधीनगर परिसरात आपलं नवीन विश्व बसवलं.. लग्न झालं, संसार उभा राहिला.. मात्र मूळ घराची आठवण मनात कुठेतरी दाबलेलीच होती..
         अशातच निवडणूक विभागाची विशेष पुनरिक्षण अर्थात एसआयआर मोहीम सुरू झाली. मलकापूर येथील बीएलओ नीता भोंबे आणि सहाय्यक अनिल भोंबे हे गांधीनगर परिसरात मतदारांची पडताळणी करत होते. तपासणीदरम्यान नवनाथ गायकवाड यांच्या नोंदीची पडताळणी करताना ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केडगावचे असल्याचे समोर आले. बीएलओ यांनी तातडीने सोलापूरच्या बीएलओ विठ्ठल लगस यांच्याशी संपर्क साधला. धक्कादायक म्हणजे, सोलापूरच्या नोंदवहीत नवनाथ गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचे समजले जात होते..! मात्र बीएलओच्या सतर्कतेमुळे नवनाथ मलकापूर येथे सुखरूप असल्याचं स्पष्ट झालं आणि दोन्ही ठिकाणच्या बीएलओंच्या समन्वयाने तब्बल 30 वर्षांनंतर कुटुंबाशी संपर्क झाला.