गुरुकृपेशिवाय मोक्षाची प्राप्ती नाही : हेमराजजी शर्मा* बुलढाणा येथे निरंकारी वार्षिक संत समागम उत्साहात

गुरुकृपेशिवाय मोक्षाची प्राप्ती नाही : हेमराजजी शर्मा
* बुलढाणा येथे निरंकारी वार्षिक संत समागम उत्साहात
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       मनुष्य जन्म मिळणे ही अलौकिक बाब आहे आणि तो जन्म मनुष्याप्रमाणे जगणे हे त्याहूनही अलौकिक आहे. मनुष्यजन्माचे सार्थक गुरु शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. गुरु पासून मिळालेले ज्ञान हे जीवनातील भ्रमाची समाप्ती करते आणि भ्रमाची समाप्ती म्हणजेच मोक्ष प्राप्ती आहे. गुरुकृपेशिवाय ही मोक्ष प्राप्ती मिळत नाही त्यामुळे गुरूला शरण या, असे आवाहन महात्मा हेमराजजी शर्मा यांनी 27 जुलै रोजी बुलढाणा येथे आयोजित सत्संगात बोलताना केले. 
         सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम कृपेने गुरु पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला 27 जुलै रोजी सोमवारी बुलढाणा ते खामगाव रोड वरील गोल्डन पॅलेस या मंगल कार्यालयात संत निरंकारी मंडळाच्या बुलढाणा ब्रांचच्या वतीने वार्षिक संत समागमाचे आयोजन करण्यात आले होते. संत निरंकारी मिशन दिल्ली प्रचार विभागाचे कोऑर्डिनेटर आ. महात्मा हेमराजजी शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा संत समागम पार पडला. संत निरंकारी मिशन एक आध्यात्मिक विचारधारा असून जगभरात मानवतेचा संदेश देण्याचे कार्य करीत आहे, त्यामुळे मानवता हाच सगळ्यात मोठा धर्म आहे आणि प्रत्येकाने मानवता धर्माचे पालन केले पाहिजे, असे यावेळी पुढे बोलताना महात्मा हेमराजजी शर्मा यांनी सांगितले. 
        गुरु शिवाय ब्रह्मज्ञान मिळत नाही आणि ब्रह्मज्ञानाशिवाय खऱ्या देवाची ओळख होत नाही. त्यामुळे गुरूला शरण जाऊन परमेश्वराची ओळख करून घ्या आणि डोळस भक्ती करा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. संत निरंकारी मंडळाच्या छत्रपती संभाजी नगर झोनचे प्रमुख आ. सचिनजी अधाने यांच्यासह ज्ञानप्रचारक तथा बुलढाणा जिल्हा संयोजक शालिकराम चवरे, संतोष शेगोकार, बुलढाणा ब्रांच मुखी हनुमान भोसले, अकोला तथा गडचिरोली क्षेत्रीय संचालक शिवाजी पाटील, राजकुमार खंडागळे, सुरेश तलरेजा, शिवचरण गाडगे, दिपक इंगळे, रामदास इंगोले आदींची प्रमुख उपस्थिती होती. बुलढाणा ब्रांचच्या सेवादल संचालक पदी सुभाष राजपूत व सेवादल शिक्षण पदी रामेश्वर मानमोडे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना महात्मा हेमराजजी शर्मा यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या संत समागमाला हजारो महिला व पुरुष भाविकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निरंकारी सेवादलाने विशेष परिश्रम घेतले.