महानायक वसंतरावजी नाईक जयंती उत्साहात साजरी* गुणवंत विद्यार्थी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार

महानायक वसंतरावजी नाईक जयंती उत्साहात साजरी
* गुणवंत विद्यार्थी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा  सत्कार
अमरावती : (एशिया मंच न्यूज )
          महानायक व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त बंजारा बहुउद्देशीय सामाजिक व सांस्कृतिक विकास संस्था, अमरावती यांच्या वतीने आयोजित 'गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व जाहीर व्याख्यान' हा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी जाधव सेलिब्रेशन, शेगाव–राहाटगाव रोड, अमरावती येथे 1 जुलै रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला बंजारा समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजबांधव, विद्यार्थी, पालक, महिला तसेच युवक-युवतींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
             कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अमरसिंग राठोड तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण उपसंचालक  राम पवार, पोलिस उपअधीक्षक उत्तमरावजी जाधव, प्राचार्य डॉ. जयवंत वडते व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य डॉ. पंडित चव्हाण (नांदेड) यांनी "महानायक वसंतरावजी नाईक यांचे शिक्षण व कृषी क्षेत्रातील योगदान" या विषयावर प्रभावी व्याख्यान देत वसंतरावजी नाईक यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे महाराष्ट्रात हरितक्रांती, सिंचन, शिक्षण आणि ग्रामीण विकासाला मिळालेली गती विशद केली. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
             जिल्हा कृषी अधिकारी  निलेश राठोड यांनी नाईक साहेब : एक दृष्टा नेता – हरित क्रांती व शासकीय योजना या विषयावर मार्गदर्शन करताना वसंतरावजी नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील धोरणांचा शेतकरी व ग्रामीण विकासावर झालेला दूरगामी परिणाम स्पष्ट केला. शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेऊन आधुनिक शेतीचा स्वीकार करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
            यावेळी सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीमध्ये ७५ टक्के व त्यापेक्षा अधिक, तसेच बारावीमध्ये ७० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. याचबरोबर पीएच.डी., नेट/सेट पात्रता प्राप्त केलेले विद्यार्थी, विविध शासकीय विभागांमध्ये निवड झालेले अधिकारी व कर्मचारी तसेच पुरस्कारप्राप्त व्यक्तींचाही विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल पालकांचाही विशेष गौरव करण्यात आला.
            अध्यक्षीय भाषणात प्राचार्य अमरसिंग राठोड यांनी शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीचे सर्वात प्रभावी साधन असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण आणि प्रशासकीय सेवेकडे वाटचाल करावी, असे आवाहन केले. समाजातील गुणवंतांचा सन्मान करण्याची ही परंपरा प्रेरणादायी असून त्यामुळे नव्या पिढीला यशासाठी प्रेरणा मिळते, असे त्यांनी नमूद केले.
              कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील निवृत्त प्रशासकीय अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, डॉक्टर, अभियंते, कृषी अधिकारी, समाजसेवक तसेच बंजारा समाजातील नायक, कारभारी, आसामी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या बळावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असा विश्वास व्यक्त केला.
              कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. शंकर चव्हाण, सूत्रसंचालन प्रा. विशाल जाधव व आभार शालिकरम राठोड यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले. स्वागत समिती, कार्यक्रम समन्वय समिती व संपर्क समितीच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले.
             बंजारा बहुउद्देशीय सामाजिक व सांस्कृतिक विकास संस्था व अमरावती महानगर तांडा यांच्या वतीने आयोजित या उपक्रमामुळे समाजातील गुणवंतांचा गौरव होण्याबरोबरच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरणा मिळाली. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. उत्साह, शिस्त आणि समाजहिताचा संदेश देणारा हा कार्यक्रम सर्वांच्या स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.