रोशनने केले गोतमारा तांड्याचे नाव 'रोशन'!* अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांनी पीएसआयपदी निवड झालेल्या रोशन चव्हाणचा केला गौरव

रोशनने केले गोतमारा तांड्याचे नाव 'रोशन'!
* अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांनी पीएसआयपदी निवड झालेल्या रोशन चव्हाणचा केला गौरव 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर पोलीस उपनिरीक्षक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मोताळा तालुक्यातील गोतमारा येथील रोशन वामन चव्हाण यांचा अभिता कंपनीचे सीईओ तथा माजी उपजिल्हाधिकारी सुनील शेळके यांनी गौरव केला. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

         शिक्षण हे वाघिणीचे दूध असून ज्याने प्राशन केले तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असा विचार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. शिक्षणाच्या लख्ख प्रकाशाने आज वाड्या, वस्त्या उजळून निघाल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या मोताळा तालुक्यातील गोतमारा येथील वामन चव्हाण यांनी आपल्या तीनही मुलांना शिक्षणाच्या वाटेवर चालण्याचे संस्कार दिले. मुलांनीही शिक्षणाचा विचार मनात रुजवून प्रगती साधली आहे. मोठा अमोल, मधला सचिन दोघेही पोलीस आहेत. तर, धाकटा रोशन पोलीस सेवेत असतांनाच पोलीस उपनिरीक्षक झाला आहे.

          गोतमारा येथील रोशन चव्हाण अवघ्या १९ व्या वर्षी पोलीस दलात भरती झाला. ड्युटीवर असतानाही त्याने जिद्द सोडली नाही. सातत्याने अभ्यास करत जिद्द आणि मेहनतीच्या बळावर त्याने पोलीस सब-इन्स्पेक्टर परीक्षा उत्तीर्ण केली. यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. गोतमारा या लहानशा तांड्यातील अनेक युवक नोकरीला लागले आहेत. त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळले. एकेकाळी डोंगराळ भागातील या तांड्याचे नाव कोणालाही माहीत नव्हते ; मात्र आज रोशनसारख्या मुलांनी या तांड्याचे नाव जिल्ह्यातच नव्हे, तर महाराष्ट्रात रोशन केले. गोतमारा तांड्याला रोशन चव्हाण यांच्या यशाने नवी ओळख मिळाली आहे. तांड्यातील पिढीसमोर शिक्षण, जिद्द कर्तृत्वाचा नवा आदर्श उभा राहिला आहे. यावेळी रोशन यांचे वडील वामन चव्हाण, मामा विजय राठोड, पत्रकार प्रेमकुमार राठोड यांच्यासह आदी उपस्थित होते.