धनादेश अनादर प्रकरणी आरोपीला एक महिन्याची शिक्षा* अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती व्ही. जे. कोरे यांचा निकाल* राजर्षी शाहू मल्टिस्टेटला अडीच लाखाची नुकसान भरपाई देण्याचा आदेश

धनादेश अनादर प्रकरणी आरोपीला एक महिन्याची शिक्षा
* अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती व्ही. जे. कोरे यांचा निकाल
* राजर्षी शाहू मल्टिस्टेटला अडीच लाखाची नुकसान भरपाई देण्याचा आदेश

छत्रपती संभाजीनगर : (एशिया मंच न्यूज )
           धनादेश अनादर प्रकरणात आरोपीला एक महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच फिर्यादी पतसंस्थेला दोन महिन्यांत अडीच लाख रुपयांची नुकसान भरपाई अदा करण्याचा आदेश दिला आहे. औरंगाबाद येथील न्यायालय क्र. ४ च्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती व्ही. जे. कोरे यांनी १ जुलै रोजी हा महत्वपूर्ण निकाल दिला.

           प्रकरणानुसार, औरंगाबाद येथील स्टेशन रोडवरील सिल्क मिल्क कॉलनीतील रहिवासी रुकसाना बेगम अब्दुल सलिम (वय ५८) यांनी राजर्षी शाहू मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीकडून २०१९ मध्ये ५ लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले होते. कर्जफेडीसाठी आरोपीने ८ मार्च २०२१ रोजी २ लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, तो धनादेश बँकेत सादर केल्यानंतर 'अपर्याप्त निधी' या कारणाने अनादरीत झाला. त्यानंतर सोसायटीने कायदेशीर नोटीस बजावूनही आरोपीने रक्कम भरली नाही. त्यामुळे न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली. 
सुनावणीदरम्यान न्यायालयाने फिर्यादी पतसंस्थेने सादर केलेले तोंडी व कागदोपत्री पुरावे ग्राह्य धरले. आरोपीने कर्ज घेतल्याचे नाकारले नसल्याचे तसेच धनादेश सुरक्षिततेसाठी दिला होता, हा बचाव सिद्ध करण्यात अपयश आल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे कलम १३८ अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्यावतीने विधिज्ञ आर. यु. गव्हाणे यांनी युक्तिवाद केला.


* धनादेश अनादराच्या वाढत्या घटनांवर व्यक्त केली चिंता

          शिक्षा सुनावताना न्यायालयाने धनादेश अनादराच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त केली. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षा आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवत आरोपीला कारावास व नुकसान भरपाईची शिक्षा सुनावली. नुकसानभरपाई न भरल्यास आणखी १५ दिवसांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. तसेच आरोपी गैरहजर असल्याने तिच्याविरुद्ध शिक्षा भोगण्यासाठी दोषी वॉरंट जारी करण्याचेही आदेश देण्यात आले.