मुलाचा अपघात झाला नसून घातपात झाल्याची पालकांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार * घातपाताच्या दिशेने तपास करण्याची मागणी

मुलाचा अपघात झाला नसून घातपात झाल्याची पालकांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार 
* घातपाताच्या दिशेने तपास करण्याची मागणी 

 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        मुलाचा अपघात झाला नसून घातपात झाल्याचा दाट संशय असल्याची तक्रार अपघातात मृत्यू झालेल्या मंगेश कंकाळ या तरुणाच्या वडिलांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे 22 जून रोजी केली आहे. 

         वडील दिगंबर कंकाळ यांनी तक्रारीत म्हटले आहे की, माझ्या मुलाचा अपघात झाला नसुन त्याचा घातपात झाल्याचा माझा संशय आहे. माझा मुलगा हा घटनेच्या दिवशी दुपारी अंदाजे ३.१५ वाजता माझ्या मोठ्या मुलाला बस स्टँडवर सोडायला गेला होता. जातेवेळी तो सांगुन गेला होता की, मी दादाला बस स्टँडला सोडतो आणि क्रांतीनगर येथे माझ्या मित्राला मोटरसायकल घ्यावयाची आहे. त्याला मोटरसायकल घेऊन देतो. त्यानंतर सायंकाळी ओंकारलॉन धाडनाका येथे विजय झिने याच्या नातेवाईकाच्या लग्नाला जाणार असे सांगुन घरुन गेला. त्याच प्रमाणे क्रांतीनगर येथे गेल्यावर विजय दगडुबा झिने माझ्या मुलाचा मित्र विजय झिने यांच्या नातेवाईकाच्या लग्नाला तो आणि विजय झिने हे माझ्या मुलाच्या मोटरसायकने लग्नाला गेले. तेथे गेल्यावर विजय दगडुबा झिने याचा सख्खा मामे भाऊ करण खिल्लारे हा त्यांना भेटला ते तिघेही लग्नामध्ये होते, असे नातेवाई सांगतात. माझा मुलगा लग्नामध्ये जवळपास ९.१५ वाजेपर्यंत जेवण वाढत होता असे नातेवाईक सांगतात. आणि त्याच्या मोबाईलमध्ये शेवटी विजय झिने याने फोन केला आहे. माझ्या मुलाला लग्नामधुन विजय झिने आणि करण खिल्लारे यांनी नांद्राकोळी रस्त्यावर कशाला आणले / नेले? हे त्यांनाच माहित असावे. ते म्हणतात आमचा अॅक्सिडंट झाला. आम्हाला कोणीतरी मागुन ठोकले, तर कधी, कधी सांगतो की पुढुन ठोकले असे नातेवाईकांनी विचारपुस केली असताना सांगीतले. घटनेच्या ठिकाणावरुन माझ्या मुलाची मोटरसायकल पोलिसांनी आरटीओ पंचनामा न करताच पोलिस स्टेशनला आणली. घटनास्थाळावर पंचनामा करतांना पोलिसांनी मला घटनास्थळावर नेले नाही. माझ्या समोर कोणताही पंचनामा केलेला नाही. माझ्या मुलाच्या गाडीला समोरुन आणि मागुन सुध्दा काहीही धक्का सुध्दा लागलेला दिसून येत नाही. असे गाडी पाहिल्यावर कोणीही सांगेल असे समजते. म्हणून माझ्या मुलाच्या मोटरसायकलचा पोलिस स्टेशनमध्ये आरटीओ पंचमाना करण्यात यावा. त्यावरुन सुध्दा सिध्द होईल की, गाडीचा अॅक्सिडंट झाला नाही. माझ्या मुलाचा अॅक्सिडंट झाला नसून माझ्या मुलाचा घातपातच झाला असे माझे म्हणणे आहे. विशेष म्हणजे माझ्या मुलाचे माझ्या राहत्या घरीच १ मे २०२६ रोजी सायंकाळी लग्न झाले. त्या लग्नामध्ये सुध्दा विजय झिने याने डिजेवाल्याला मारहाण केली होती. २७ मे, २०२६ रोजी सुध्दा त्यानेच माझ्या मुलालाच लग्नामध्ये का नेले होते?. वार्डातील कोणत्याच व्यक्तीला नातेवाईकांना किंवा माझ्या मुलाच्या दुसऱ्या कोणत्याच मित्राला लग्न पत्रिका का नव्हती?. आणि त्यालाच का लग्नामध्ये नेले?. आणि त्याचाच अॅक्सिडंट होतो. आणि त्याच्या सोबतचे विजय झिने आणि करण खिल्लारे त्यांना काहीच सुध्दा लागत नाही?. त्यामुळे माझ्या मुलाचा अॅक्सिडंट झाला की घातपात झाला हे दोघेच सांगु शकतात. त्यामुळे माझ्या मुलाच्या लग्नापासून म्हणजे १ मे २०२६ ते आजपर्यंत माझ्या मुलाच्या आणि विजय झिने तसेच करण खिल्लारे यांच्या मोबाईलची सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) तपास कामी घ्यावी. जेनेकरुन या तिघांमध्ये काय काय संभाषण झाले त्यांना इतर कोणकोणत्या व्यक्ती सोबत काय, काय संभाषण झाले यावरुन त्याचा घातपात कसा झाला व कुणी केला हे सिध्द होऊ शकते. तसेच माझ्या मुलाच्या बॉडीचे पोस्टमार्टम केले त्याचे शाम्पल (नमुने) व घटनास्थळी फॉरेंसिकलॅबची गाडी गेली असता त्या घटना ठिकाणी फॉरेंसिक लॅबटिमला काय काय वस्तु, साहित्य, इतर काही संययीत वस्तु मिळून आल्या असतील तर त्या तपासणीकरिता पाठविण्यात याव्यात. तसेच ओंकारलॉन पासून ते घटनास्थळापर्यंतचे दोन्ही बाजुचे सिसीटिव्ही फुटेज तपासण्यात यावे, जेणेकरुन ते तिघे तेथे कसे पोहचले आणि त्या ठिकाणी काय घडले हे सिध्द होऊ शकेल. माझ्या मुलाचा अपघात झाला असे विजय झिने आणि करण खिल्लारे यांचे म्हणणे आहे. आणि विजय झिने म्हणतो की, मी जास्त दारु पिलेलो होतो त्यामुळे मी बेशुध्द झालो होतो. तर माझ्या मुलाची डेडबॉडी आणि विजय झिने याला देखील कुणीतरी गाडीमध्ये टाकुन दवाखान्यामध्ये आणले,  विजय झिने याला दवाखान्यामध्ये भरती केले तेव्हा विजय झिनेला कोणा, कोणाचे फोन येत होते ? तो जर बेशुध्द होता तर त्याच्या फोनवर तो स्वतः कोणा कोणाला बोलत होता? त्याच्या फोनवर कुणाकुणाचे काय, काय संभाषण होत होते? रात्रभर त्याला फोन येत होते यावरुन सिध्द होते की, तो बेशुध्द नव्हता. घटनास्थळी काय झाले ते विजय झिने, करण खिल्लारे यांनाच माहिती आहे. दवाखान्यातून करण खिल्लारे हा दवाखान्यातून कोणालाही काहीही न सांगता पळून गेला होता. त्यामुळे पोलिस प्रशासनाने घातपाताच्या दिशेने सदर घटनेचा संपूर्णपणे सखोल चौकशी व तपास करून माझ्या मुलाला न्याय द्यावा, अशी विनंती दिगंबर कंकाळ यांनी केली आहे.