* अल मदीना फाउंडेशन आणि मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीची मागणी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
स्वतःला भाजपच्या प्रवक्त्या म्हणवून घेणाऱ्या नाझिया इलाही खान यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित पैगंबर मोहम्मद साहेब आणि माँ आएशा यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह व अपमानास्पद टिप्पणी केली आहे. या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना तीव्रतेने दुखावल्या गेल्या असून, नाझिया खान यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी 'अल मदीना फाउंडेशन' व 'मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी'च्या वतीने पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षकांना सादर केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, नाझिया इलाही खान या नेहमीच दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून दंगल घडवण्याच्या प्रयत्नात असतात. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्याकडून मुस्लिम समाजाबद्दल सातत्याने आक्षेपार्ह विधाने आणि चिथावणीखोर भाषणे केली जात आहेत. आता त्यांनी थेट विश्वशांतीदूत पैगंबर मोहम्मद साहेब यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह विधान केले असून, याचे तीव्र पडसाद संपूर्ण देशभरात व जगभरात उमटत आहेत.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे, असे असतानाही नाझिया इलाही खान यांच्यासह गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप, निलेश राणे, लांडे यांसारख्या विविध घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींकडून एका विशिष्ट समाजाला लक्ष केले जात आहे. खुलेआम धमक्या आणि चिथावणीखोर 'हेट स्पीच' देऊन राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असतानाही पोलीस प्रशासन त्यांच्यावर कोणतीही कडक कारवाई का करत नाही? असा सवालही या निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. पैगंबर मोहम्मद साहेब आम्हाला आमच्या प्राणापेक्षाही जास्त प्रिय आहेत. त्यांच्या संदर्भात केलेली कोणतीही आक्षेपार्ह टिप्पणी मुस्लिम समाज सहन करणार नाही. जर संबंधित व्यक्तींवर योग्य आणि कडक कायदेशीर कारवाई केली नाही, तर भविष्यात याचे तीव्र पडसाद उमटू शकतात. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या सर्व प्रवृत्तींवर तात्काळ कारवाई व्हावी, अन्यथा संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अल मदीना फाउंडेशन व मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
या निवेदनावर दोन्ही संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन देतेवेळी जामा मस्जिदचे इमाम मौलाना कलीम खान रिजवी, मौलाना इरफ़ान रजा क़ादरी वैजापुर, माइनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी के हसन ईनामदार, अल मदीना फाउंडेशन के अध्यक्ष नदीम शेख, वसीम खान, इमाद काजी, शेख फरदीन, शेख फरहान, अल्ताफ भाई आदि असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते.
