पत्रकारांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करा
* बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार संघाची जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना जाहीरपणे शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यात उमटत असून, बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषद च्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. याप्रकरणी खासदार पाटील यांच्यावर ‘पत्रकार संरक्षण कायद्या’अंतर्गत तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करणारे निवेदन आज 26 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पाठवण्यात आले.
मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पत्रकार हा समाजाचा आरसा असून, प्रशासन, कायदेव्यवस्था आणि न्यायपालिका यांना जोडणारा दुवा आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर आणि लोकहितार्थ आवाज उठवणाऱ्या पत्रकारांवर गेल्या काही काळापासून सातत्याने हल्ले, मारहाण आणि शिवीगाळीचे प्रकार वाढत आहेत.
नुकत्याच घडलेल्या एका घटनेत, खासदार संजय दिना पाटील यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली असून, त्यांच्या आई-बहिणींवरून अक्षेपार्ह वक्तव्ये केली. एवढेच नव्हे तर पत्रकारांना थेट जीवे मारण्याची धमकीही दिली. लोकसभेच्या एका जबाबदार आणि विद्यमान खासदाराकडून अशा प्रकारचे असंविधानिक, उद्धट आणि बेजबाबदार वर्तन घडणे अत्यंत अनपेक्षित आणि निंदनीय आहे, असे पत्रकार संघाने म्हटले आहे.
या घटनेमुळे राज्यातील पत्रकार वर्गात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. पत्रकारितेची अस्मिता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पत्रकारांच्या सुरक्षेला घातकी ठरणारी ही प्रवृत्ती समाजात वाढू नये, यासाठी खासदार संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार संघ तसेच डिजिटल मीडिया परिषद संघटनांनी केली आहे.
खासदार पाटील यांच्यावर त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पत्रकारांच्या वतीने देण्यात आला आहे.
निवेदन देताना मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीत सिंग राजपूत, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे समन्वयक राजेश डिडोळकर, प्रदेश प्रतिनिधी गणेश निकम, डिजिटल मीडिया परिषद चे विभागीय सचिव जितेंद्र कायस्थ, डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष गणेश सोळंकी, नितीन शिरसाट,विजय देशमुख,संजय जाधव, विलास खंडेराव, सुरेखाताई सावळे, दीपक मोरे,सुनील मोरे, अजय राजगुरे, प्रशांत सपकाळ, अभिषेक वरपे, अजय काकडे,राहूल चव्हाण,रेहमत अली,शेख असिफ आदी पत्रकार या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
