* विद्यार्थी आणि शिक्षकांचे भवितव्य भाजप सरकारने उद्ध्वस्त केले : शिवराज पाटील
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
देशातील सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारी नीट पेपरफुटी आणि त्यानंतर टीईटी परीक्षा रद्द होणे ही भाजप सरकारच्या शिक्षण व्यवस्थेच्या पूर्ण अपयशाची साक्ष आहे. भाजपच्या कार्यकाळात पेपरफुटीचे सत्र सातत्याने सुरू असून सरकार मात्र पेपर माफियांना पाठीशी घालण्याचे पाप करत आहे. विद्यार्थ्यांच्या कष्टांची, शिक्षकांच्या विश्वासाची आणि शिक्षण व्यवस्थेच्या प्रतिष्ठेची सरकारला कोणतीही चिंता उरलेली नाही. भाजप सरकारनेच विद्यार्थी आणि शिक्षकांचे भवितव्य उद्ध्वस्त केले, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव शिवराज पाटील यांनी केली.
देशभर गाजलेल्या नीट आणि महाराष्ट्रातील टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने सोमवार २९ जून रोजी बुलढाणा येथे आक्रमक आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी
'देश का पीएम वीक है... तभी तो पेपर लीक है...', 'पेपर चोर... गद्दी छोड़...' छात्रों के सन्मान में... काँग्रेस मैदान में! राजीनामा द्या, राजीनामा द्या... दादा भुसे, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या! 'युवक काँग्रेस... जिंदाबाद' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
केंद्रातील आणि राज्यातील शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांना तात्काळ बडतर्फ करावे. तसेच पेपरफुटी प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक कायदे व प्रभावी यंत्रणा उभारावी, अशीही मागणीही निवेदनातून करण्यात आली.
यावेळी युवक काँग्रेस प्रदेश महासचिव तथा प्रवक्ता विश्वदीप पडोळ, प्रदेश युवक सचिव शिवराज पाटील, बुलढाणा तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष सुरज सोनुने, शैलेश खेडकर, ज्ञानेश्वर पचांगे, रवी लोखंडे, संदीप पैठणे, गणेश ठेंग, सुदर्शन पाटील, गोपाल खेडेकर, शे.मुस्ताक शे. सय्यद, शे.अजर शे. अशपाक, शे.सांज शे. काबीर, गौरव नाईक यांच्यासह युवा काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
* पेपर माफीयांना सरकारकडून राजकीय संरक्षण : विश्वदीप पडोळ
नीट पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त झाले असून, प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरण्याचे पाप सरकारने केले आहे. त्यानंतर २७ जून रोजी ठाणे येथे टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याची घटना समोर आल्याने राज्यातील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या पेपर माफियांना राजकीय संरक्षण मिळत असल्यामुळेच अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना तातडीने न्याय द्यावा, पेपर माफिया आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी. अन्यथा युवक काँग्रेस राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारेल, अशी ठाम भूमिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा प्रवक्ता विश्वदीप पडोळ यांनी व्यक्त केली.
