* तरुणांनी व्यवस्था परिवर्तनासाठी पुढाकार घ्यावा : धर्मकीर्ती महाराज परभणीकर
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
आपली संपूर्ण व्यवस्थाच आज रसातळाला गेली आहे. तरुणांना स्वातंत्र्य आणि सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी शिव शाहू फुले आंबेडकर यांचे विचार तेवत ठेवावे लागतील. यासाठी महापुरुषांच्या विचाराच्या वारसदारांनी पुढे येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन धर्मकीर्ती महाराज यांनी बुलडाणा येथे केले. मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे द्विशताब्दी जन्मोत्सव वर्ष आणि लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुलढाणा येथे मराठा सेवा संघ जिल्हा बुलढाणा (दक्षिण) च्या वतीने प्रबोधनात्मक व्याख्यान व गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे भव्य आयोजन दिनांक 27 जून रोजी करण्यात आले . “शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार आणि आजचे वास्तव” या विषयावर प्रमुख वक्ते धर्मकीर्ती महाराज परभणीकर यांनी विचार मांडले. आजची व्यवस्था रसातळाला गेली असून तीचे परिवर्तन करण्यासाठी शिव, शाहू, फुले व बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक वारसांनी पुढाकार घ्यावा. तरुणांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करावे. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मुलांना पालकांनी दिले पाहिजे असे प्रतिपादन केले. स्थानिक शरद कला महाविद्यालयाच्या सभागृहात हा सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विचारपीठावर राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून जिजाऊ वंदना म्हणण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बुलढाणा दक्षिणचे इंजिनियर रविकांत काळवाघे यांनी भूषवले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी महापुरुषांचे दैवतीकरण थांबवावे. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती न म्हणता महाराजांचे पोवाडे गायले जावेत असा विचार व्यक्त केला व मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाची ही चळवळ अशीच पुढे सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला.
या सोहळ्यात विविध क्षेत्रांत व परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गुणगौरव करण्यात आला. तसेच जिल्हा व तालुका कार्यकारणी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र यावेळी प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत गाडगेबाबा प्रबोधन कक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद टाले यांनी केले, तर प्रमुख पाहुणे दलितमित्र माधवराव हुडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कार्याध्यक्ष शिवशंकर भारसाकळे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. विचारपीठावर मराठा सेवा संघाचे राज्य संघटक मनोहर तुपकर, जिजाऊ सृष्टी व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ज्योतीताई जाधव, कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिनकरराव बावस्कर, कर्मवीर भाऊराव पाटील वस्तीगृह कक्षाचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव कडाळे, प्राचार्य विष्णुपंत पाटील, सिंधुताई पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभय पाटील, संजय खांडवे, संजय विखे, दत्तात्रय शेळके, शरद म्हस्के, सुबोध चिंचोले, विवेक काळे, व मराठा सेवा संघ नागरी सहकारी पतसंस्थेचे रामेश्वर भालके, नितीन सपकाळ यांनी विशेष परिश्रम घेतले. शरद कला महाविद्यालयाचे प्राचार्य विष्णुपंत पाटील यांनी या कार्यक्रमासाठी सभागृह उपलब्ध करून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठा सेवा संघाचे जिल्हा समन्वयक प्रवीण मिसाळ यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जिल्हा सचिव शिवश्री विलासराव तेजनकर यांनी मानले. या सोहळ्याला जिल्ह्यातील नागरिक, पदाधिकारी कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
