बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
दलीत म्हणजे केवळ विशिष्ट जातीत जन्मलेला माणूस नव्हे, तर ज्याचे शोषण झाले आहे, ज्याला हक्कांपासून वंचित ठेवले गेले आहे, तो प्रत्येक माणूस दलीत आहे. अशा प्रकारच्या दलीत साहित्य चळवळीला ‘अस्मितादर्शकार’ डॉ. गंगाधर पानतावणे यांनी एक विचारवंत, समीक्षक, संपादक आणि साहित्यिक म्हणून सन्मानकारक समृद्धी मिळवून दिली, असे विचार साहित्य संशोधक तथा भाषा अभ्यासक डॉ. रवींद्र इंगळे चावरेकर यांनी व्यक्त केले.
स्मृतीशेष साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त २८ जून रोजी बुलढाणा येथील पत्रकार भवन येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आले होते. याप्रसंगी, डॉ. रवींद्र इंगळे चावरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, गुरू शिष्य परंपरा नसताना स्वयंभू पद्धतीने डॉ. गंगाधर पानतावणे यांनी कर्तृत्व सिद्ध केले. त्यांनी व्यवस्थेच्या विरोधात बंडखोरी करत अस्मितादर्शच्या रूपाने स्वतंत्र चळवळ उभारली. खऱ्या अर्थाने, दलीत साहित्य चळवळीला विस्तारित करण्याचे काम डॉ. गंगाधर पानतावणे यांनी केले, असे विविधांगी विचार रवींद्र इंगळे चावरेकर यांनी मांडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला, डॉ. पानतावणे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर, ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक सुरेश साबळे यांनी प्रास्ताविकातून डॉ. गंगाधर पानतावणे यांचा जीवनपट मांडला. डॉ. पानतावणे यांनी आपले संपूर्ण आयुष्यच पुरोगामी, फुले-आंबेडकरी साहित्य, सांस्कृतिक चळवळीला
समर्पित केले. त्यासाठी त्यांनी वाचन, लेखन, अध्यापन, व्याख्यान आणि वैचारिक प्रबोधनासाठी हयातभर भ्रमंती केली, अनेक परिघावरच्या वंचित विषयाला, व्यक्तीला लिहित्या बोलत्या नव लेखक,कवी,कथाकार यांना लिहिण्याची संधी दिली. उभे केले असे त्यांनी सांगितले. यानंतर, साहित्यिक रवींद्र साळवे यांनी सांगितले की, डॉ. गंगाधर पानतावणे यांनी सुरू केलेले 'अस्मितादर्श' नावाचे त्रेमासिक हे केवळ एक मासिक नव्हते, तर साहित्य चळवळीचे व्यासपीठ होते. लेखकांना आणि कवींना सुरुवातीच्या काळात 'अस्मितादर्श'नेच हक्काचे व्यासपीठ मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले. बुलढाणा जिल्ह्याच्या पत्रकारितेला वैचारिक आणि प्रबोधनात्मक रंग देऊन पत्रकारिता समृद्ध करण्यासाठीही डॉ. गंगाधर पानतावणे यांचे अत्यंत महत्त्वाचे योगदान राहिले असल्याचे, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांनी सांगितले. शाहीर डी.आर. इंगळे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत डॉ. पानतावणे यांनी समाजहितासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. या कार्यक्रमासाठी सर्वश्री चंद्रशेखर केणे, कॉ. पंजाबराव गायकवाड, गणेश राणे, संतोष पाटील, विलास मानवतकर, प्रविण सुरडकर, प्राचार्य डॉ. गोविंद गायकी, पत्रकार सिद्धार्थ आराख, नितीन शिरसाट, लक्ष्मीकांत बगाडे, दिनेश मुढे, संतोष दुर्गे, राहुल चव्हाण, राजेश डीडोळकर,विनोद सावळे, तुषार यंगड यांसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन पत्रकार अभिषेक वरपे यांनी केले. प्रा. शशिकांत जाधव यांनी आभार मानले.
