जगाला वाचविण्यासाठी आदिवासींच्या भाषेतील ज्ञानपरंपरा समजून घेणे गरजेचे - प्रशांत सोनोने

जगाला वाचविण्यासाठी आदिवासींच्या भाषेतील ज्ञानपरंपरा समजून घेणे गरजेचे - प्रशांत सोनोने
बुलढाणा  : (एशिया मंच न्यूज )
        निसर्गाला केंद्रस्थानी ठेवून शाश्वत विकासाची संकल्पना मांडणाऱ्या व जगाला विनाशातून वाचविणाऱ्या आदिवासी समूहाची ज्ञानपरंपरा समजून घ्यायची असेल तर त्यांच्या भाषा जपल्या पाहिजेत, असे आवाहन जल जमिन जंगल चळवळीचे कार्यकर्ते आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक व प्रसिद्ध छायाचित्रकार प्रशांत सोनोने यांनी येथे केले. 
        विदर्भ महाविद्यालय व मुक्ता प्रबोधिनी, अमरावती आयोजित भाषा, आत्मसन्मान आणि लोकशाही या विषयावर राज्य स्तरीय कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी जिजाऊ सभागृहात ते बोलत होते. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख प्रा.मुनेश्वर जमईवार होते, तर प्राचार्य गोविंद गायकी मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रशांत सोनोने पुढे म्हणाले की, आजघडीला संपूर्ण जगात सर्वाधिक भाषा सुमारे १२५० व वैवीध्यपुर्ण संस्कृती केवळ भारतात आहेत. यातील अर्ध्याधिक भाषा केवळ अन् केवळ आदिवासींच्याच आहेत. प्रत्येक भाषेचा एक वैशिष्ट्यपूर्ण जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन असतो, जीवनदृष्टी असते, जगण्याचं तत्त्वज्ञान, शहाणपण असतं, हजारो वर्षांपासून अर्जीत केलेलं हे ज्ञान व ह्या समृद्ध ज्ञान परंपरेचं जतन ही जीवसृष्टी वाचविण्यासाठी अत्यावश्यक आहे. परंतु आज मात्र जागतिक पातळीवर तथाकथित भ्रामक विकासाच्या नावाखाली आदिवासींचे विस्थापन चालू आहे.  "जिथे आदिवासी तिथेच धरण त्यातच आहे आदिवासींचे मरण जिथे आदिवासी तिथेच खाण, त्यातच झाली आदिवासी जिवनाची घाण, जिथे आदिवासी तिथेच विविध प्रकल्प, हा आहे आदिवासींना मारण्याचा दृढ संकल्प. जगभरात भांडवलदारी व्यवस्थेचे भरणपोषण करण्यासाठी आदिवासींच्या विस्थापनाचे कटकारस्थान करण्यात येत आहे. आदिवासीसाठी वन हेच जीवन असून,त्यांच्या नैसर्गिक रहिवासातून त्यांचे विस्थापन हे त्यांच्या भाषा संस्कृती पासूनच उखडने असते. जगभरातील नवसाम्राज्यवादी देश हव्यासापोटी आदिवासींची निसर्गधर्मी संस्कृती, भाषा, कला आणि ज्ञान नष्ट करून . त्यांच्यावर आपली भाषा व विकृत संस्कृती लादीत आहेत. न्युगी वा थियांगो या ख्यातनाम आफ्रिकन साहित्यिकाने म्हटले कोणताही देश दुसऱ्या देशाला सैन्य आक्रमणाद्वारे वा त्यांच्या आर्थिक नाड्या दाबून कदापिही गुलाम करू शकत नाही, तर आपली भाषा व संस्कृती त्यांच्यावर लादूनच त्यांना अपरिमित काळापर्यंत गुलाम करित असतो, म्हणून मेंदूचे विउपनिवेशिकरण करणे आत्यंतिक गरजेचे सांगितले.करिता हा सांस्कृतिक नरसंहार तत्काळ थांबविण्यासाठी भाषा संरक्षण व संवर्धन करणाऱ्या जगभरातील भाषा तज्ञांनी आदिवासीच्या मूलभूत जल, जंगल जमीनीच्या लढ्यात उतरणे गरजेचे असल्याचे शेवटी प्रशांत सोनोने यांनी व्यक्त केले.
       कार्यशाळेच्या समारोपाचे सुत्रसंचलन प्रा.डॉ.निलेश राऊत यांनी केले,तर आभार प्रदर्शन संजय पांडे अधीक्षक विदर्भ महाविद्यालय यांनी केले.