छत्रपती संभाजीनगर : (एशिया मंच न्यूज )
राजर्षी शाहू मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या वतीने आयोजित ग्राहक मेळावा शनिवारी जालना रोडवरील इंडियाना हॉटेल येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. संदीप दादा शेळके होते. यावेळी मा. जि. प. अध्यक्ष श्री. द्वारकादासजी पाथ्रीकर, प्रसिद्ध उद्योजक डॉ. डी. एस. काटे, मा. जि. प. अध्यक्ष श्री. हरीशजी लखानी, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. ज्ञानेश्वरजी बागुल, पोलीस उपनिरीक्षक श्री. रवींद्रजी घायवट तसेच उमंग मॅटर्निटी अँड IVF हॉस्पिटलच्या डॉ. अश्विनीताई देशमुख यांनी मार्गदर्शन करत संस्थेच्या अल्पावधीत झालेल्या उल्लेखनीय प्रगतीचे, ग्राहककेंद्री कार्यपद्धतीचे आणि सहकार क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले. तसेच महानगरपालिका शिक्षण विभागाचे उपआयुक्त अंकुश पांढरे व जिल्हा परिषद सदस्या सौ. गीताताई पाथ्रीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मेळाव्यात गुणवंत विद्यार्थी, उद्योजक, सेवानिवृत्त शिक्षक, सेवानिवृत्त सैनिक तसेच विविध शासकीय कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. डॉ. डी. एस. काटे यांनी आपल्या मनोगतात प्रत्येक कुटुंबात बचतीची सवय, संपत्ती निर्मितीची जाणीव आणि आर्थिक स्वावलंबनाची संस्कृती रुजविण्याची गरज अधोरेखित केली. आर्थिक नियोजन हीच भविष्याची खरी ताकद असल्याचे सांगत त्यांनी राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या आर्थिक साक्षरतेच्या उपक्रमांचे कौतुक केले. मा. जि. प. अध्यक्ष द्वारकादासजी पाथ्रीकर यांनी विविध अभंग, श्लोक तसेच रामायण आणि महाभारतातील दाखले देत सहकाराचे महत्त्व विशद केले. संस्थेने समाजाभिमुख दृष्टीकोनातून उभारलेले कार्य उल्लेखनीय असून ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याची संस्थेची वाटचाल प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात संदीप दादा शेळके यांनी "मराठवड्यातील सहकाराचा उज्ज्वल वारसा जपत सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी राजर्षी शाहू मल्टीस्टेट कायम कार्यरत राहील," असा विश्वास व्यक्त केला. सहकाराची ताकद ही समाजाच्या सर्वांगीण विकासात असल्याचे सांगत त्यांनी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या भव्य रक्तदान शिबिरे, शेतकऱ्यांच्या बांधावर खत पुरविण्याचा उपक्रम, आदिवासी भागातील महिलांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू वाटप, आर्थिक साक्षरता अभियान यांसह विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला.
तसेच व्यावसायिक आणि बँकिंग क्षेत्राच्या प्रभावी माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आर्थिक सेवा, मार्गदर्शन आणि विकासाच्या संधी पोहोचविण्यासाठी संस्था भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात कार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विश्वास, पारदर्शकता आणि समाजसेवा या त्रिसूत्रीवर राजर्षी शाहू मल्टीस्टेटची वाटचाल सुरू असून भविष्यातही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कटिबद्ध राहील, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद येवले यांनी तर आभार प्रदर्शन मेजर सुरोशे सर यांनी केले.
याप्रसंगी स्थानिक संचालक मंडळ, ग्राहक, सभासद, भागधारक, सरव्यवस्थापक दिलीप चव्हाण, विभागीय व्यवस्थापक चेतन गवते, सहायक विभागीय व्यवस्थापक सौ. मीनाक्षी साळुंके, शाखा व्यवस्थापक सौ. कल्याणी पडघान, श्री. राजू खडके यांच्यासह कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
