गांधी प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात
* विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ, बुलढाणा यांच्या वतीने संचालित गांधी प्राथमिक शाळा, बुलढाणा येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम २९ डिसेंबर २०२५ रोजी अत्यंत उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणार्या या कार्यक्रमास पालक, शिक्षक आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर जामदार होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती देत, त्या उपक्रमांचे शैक्षणिक व सामाजिक फायदे स्पष्ट केले.
संस्थेचे उपाध्यक्ष वाळेकर यांनी विद्यार्थ्यांना गोष्टींच्या माध्यमातून चांगले विचार व आचार आत्मसात करण्याचे महत्त्व सांगितले. संस्थेचे सचिव मंगेश वाघमारे यांनी आरोग्यदायी सवयी, स्वच्छता व शिस्तीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमास संस्थेचे संचालक हनुमंत भवर, प्रबोधन विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक महेश कंगले यांनी केले. त्यांनी शाळेतील शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांची शिस्त व शाळेच्या भौतिक सुविधांची माहिती दिली.
या स्नेहसंमेलनास विद्यार्थी व पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. पालकांनी शाळेतील शिक्षणपद्धती व शिस्तीबाबत समाधान व्यक्त करत शाळेच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली उबाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विलास तायडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
