* म्हसला खुर्द येथील जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूलचे क्रीडा संमेलन उत्साहात
धाड : (एशिया मंच न्यूज )
विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत खेळाकडे लक्ष द्यावे. आरोग्य आणि शारीरिक विकासात खेळाची भूमिका महत्वपूर्ण आहे. केवळ छंद नव्हे तर करिअर म्हणून सुद्धा खेळाकडे बघितले पाहिजे, असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी केले.
म्हसला खुर्द येथील जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल & ज्युनिअर कॉलेजचे एकदिवसीय क्रीडा संमेलन २३ जानेवारी रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सरपंच नीलेश देठे, उपसरपंच प्रदीप घौसाळकर, कलाबाई स्कुलचे मुख्याध्यापक रफिक सर, पोलीस पाटील संदीप पालकर, नितीन उबाळे, समाधान शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कबड्डी, खो-खो, रनिंग, लांब उडी, उंच उडी यासह विविध क्रीडा प्रकारांत सहभाग घेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. पुढे बोलतांना संदीपदादा शेळके म्हणाले, क्रीडा संमेलनाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे टॅलेंट बघायला मिळाले. शिक्षकांनी शाळेतील खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे. दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. याप्रसंगी विजयी खेळाडूंना बक्षिसे वाटप करण्यात आली. प्राचार्या किरण म्हस्के यांनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.
