पराभूत उमेदवाराकडूनही कौतुक ; निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे ठरले आदर्श

पराभूत उमेदवाराकडूनही कौतुक ; निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे ठरले आदर्श
 (बुलढाणा / पुणे ) : (एशिया मंच न्यूज )
          निवडणूक आयोग व निर्णय अधिकाऱ्यांवर सातत्याने टीका होत असलेल्या काळात, एका निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे पराभूत उमेदवाराकडून जाहीर कौतुक होणे ही लोकशाहीसाठी अत्यंत सकारात्मक आणि महत्त्वाची बाब ठरत आहे. ही प्रशंसनीय कामगिरी केली आहे. बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र, उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी
      पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत  भंडारे यांच्याकडे प्रभाग क्रमांक 20, 21 आणि 26 ची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ही संपूर्ण जबाबदारी त्यांनी अत्यंत कर्तव्यदक्ष, कायदेशीर आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली. 
       विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 26 मधून पराभूत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी लाईव्ह व्हिडीओद्वारे भंडारे यांच्या कार्याचे जाहीर कौतुक केले.  त्यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रियेदरम्यान व्यक्त करण्यात आलेल्या प्रत्येक आक्षेप व शंकेचे  भंडारे यांनी तत्काळ आणि कायदेशीर पद्धतीने निरसन केले. कोणतेही आढेवेढे न घेता त्यांनी पुन्हा री-काउंटिंग करून “दूध का दूध, पाणी का पाणी” केले.
          रुपाली ठोंबरे यांनी स्पष्ट शब्दांत नमूद केले की, सर्व निवडणूक प्रक्रिया ऑन कॅमेरा, कोणत्याही संशयाला वाव न ठेवता पार पाडण्यात आली. कुठेही दबाव, मॅनेज किंवा पक्षपातीपणा न करता, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक असलेली निष्पक्षता आणि पारदर्शकता भंडारे यांनी दाखवून दिली. पराभूत उमेदवाराकडूनही अशा प्रकारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे कौतुक होणे ही दुर्मिळ आणि प्रेरणादायी घटना असून, बुलढाणेकर म्हणून आम्हाला उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे यांचा खरोखरच अभिमान आहे.